मंत्रिमंडळाचा आज विस्तार; कुणाला मिळणार संधी? नावे गुलदस्त्यात; कुणाची होणार घोर निराशा? चर्चा सूरू
मुंबई(प्रतिनिधी)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज रविवारी नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. मात्र किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार हे सारेच अद्याप गुलदस्त्यात आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानतंर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाराष्ट्र सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नागपुरातील राजभवनात हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे किती मंत्री असणार याची माहिती समोर आली आहे. तसेच गृहमंत्रिपद कोणाकडे असणार यावर सुरु असलेला वादही लवकरच मिटणार असल्याचे दिसत आहे.
आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकूण ४० मंत्री मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. मंत्रिपदाची संधी कुणाला मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना व वाचळवीर असलेल्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्याची चर्चा आहे. नागपुरात तब्बल ३३ वर्षांनी शपथविधी सोहळा होत आहे. या पूर्वी २१ डिसेंबर १९९१ मध्ये नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार व मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडला होता. शिवसेनेत पहिली फुट पडल्यावर नागपूरच्या राजभवनात शपथविधी झाला होता. यावेळी छगन भुजबळ व आणखी ७ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.