शिवतुतारी प्रतिष्ठान संचलित, कविता डाॅट काॅमचा द्वितीय वर्धापनदिनाचे नवी मुंबईतील वाशी येथे आयोजन
नवी मुंबई:(प्रदीप बडदे)
महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या कविता डाॅट काॅम साहित्य चळवळीचा द्वितीय वर्धापनदिन येत्या रविवारी दि.३० जून २०२४ रोजी मराठी साहित्य मंदिर वाशी येथे चार वाजता साजरा होत आहे. दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या वाड्या, वस्त्या तांड्यावर जात कुठलेही मानधन न घेता माय मराठीचा जागर करत प्रयोगची पन्नाशी ओलांडली आहे. आणि ही घोडदौड अविरतपणे सुरू आहे. आज पर्यंत कविता डॉट कॉमने, यात्रा, जत्रा, अखंड हरिनाम सप्ताह, दशक्रिया विधी, हळदी समारंभ, सेवा निवृत्ती, जयंती, पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम साजरे करून नवकवी यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कविता डाॅट काॅम परिवाराला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून कवी अरुण म्हात्रे, प्रमुख पाहुणे म्हणून लोककवी प्रशांत मोरे, उद्घाटक म्हणून कवी साहेबराव ठाणगे, सोबतच पूर्व अध्यक्ष कवी अशोक बागवे अशा सर्व दिग्गज मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सोबतच महाराष्ट्रातील ताज्या दमाच्या निमंत्रित कवींच्या कवी संमेलनाचा आस्वाद ही घेता येणार आहे. कार्यक्रमाचं निवेदन श्री.महेंद्र कोंडे हे करणार असून, सोबतच जेष्ठ रंगकर्मी रविंद्र औटी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सदरील कार्यक्रमास उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा. रविंद्र पाटील आणि साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्री.सुभाष कुलकर्णी यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, नवी मुंबईतील साहित्य प्रेमींनी सहभाग घ्यावा,ही नम्र विनंती!
........कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काव्यप्रेमी मंडळी मेहनत घेत आहेत.
