अलीबागच्या निलंबित तहसीलदार मीनल दळवी यांच्याकडे सापडली उत्पन्नाच्या अधिक संपत्ती : पती पत्नीस अटक
अलिबाग - अमुलकुमार जैन
महसूल विभागात भ्रष्ट्राचाराच्या घटना नेहमी समोर येत
असतात. दोन वर्षांपूर्वी लाचखोरी प्रकरणामध्ये अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी यांना निलंबित करण्यात आलं होतं. आता त्यांच्याकडे सव्वादोन कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे.ही मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पनापेक्षा ९८.९७ टक्के अधिक तर त्यांचे पती कृष्णा वसंत दळवी ( वय ५५ वर्षे) यांच्याकडे ८४.२० टक्के अधिक संपत्ती सापडल्याप्रकरणी या दोघांवर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अलिबागच्या निलंबित तहसीलदार मीनल दळवी लोकसेविका मिनल कृष्णा दळवी, तहसिलदार, अलिबाग जि. रायगड यांचेविरुध्द दि. १२/११/२०२२ रोजी अलिबाग पोलीस स्टेशन जि. रायगड गुन्हा रजि नंबर ३२७/२०२२ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (संशोधन सन २०१८) चे कलम ७, ७ (अ) अन्वये दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांचे मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.
मालमत्तेच्या उघड चौकशी दरम्यान लोकसेविका तहसीलदार मिनल कृष्णा दळवी, तहसिलदार ( सध्या निलंबित ) यांनी त्यांचे सेवाकालावधी व परिक्षण कालावधी दरम्यान भ्रष्ट व गैरमार्गाने, कायदेशिर ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची अशी रू. २,६२,०४,५९५/- इतक्या रक्कमेची मालमत्ता संपादित केली असून त्याची टक्केवारी ९८.९७ टक्के असल्याचे निष्पन्न झाले आहे.
लोकसेविका निलंबित तहसीलदार मिनल कृष्णा दळवी व त्यांचे पती कृष्णा वसंत दळवी यांनी परिक्षण कालावधीमध्ये मिळालेल्या एकूण ज्ञात उत्पन्नापेक्षा एकत्रित रू. २,२२,९४,१३८/- इतक्या रक्कमेची मालमत्ता संपादित केली असून त्याची टक्केवारी ८४.२० टक्के इतकी आहे. कृष्णा वसंत दळवी यांनी वरील प्रमाणे नमुद संपत्तीमधील मालमत्ता स्वतःच्या नावे बाळगून लोकसेविका मिनल कृष्णा दळवी यांना हेतुपुरस्सर व बेकायदेशिरपणे अपसंपदा मिळविणेसाठी प्रोत्साहन दिले म्हणून एपीएमसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांनी दिली आहे.
नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या तत्कालीन पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि पथकाने ११ नोव्हेंबर २०२२ रोजी मीनल दळवी यांच्यावर लाच घेताना कारवाई केली होती. तक्रारदार यांच्याकडे त्यांनी ५ लाखांची लाच मागून त्यापैकी २ लाख रुपये घेतले होते. त्यांच्या घराच्या झडतीत १ कोटी २ लाखांची रोकड, ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने व काही मालमत्तांची माहिती हाती लागली होती.
निलंबित अलिबाग तहसीलदार मीनल दळवी आणि आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्याकडे सव्वादोन कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी लाचखोरी प्रकरणात निलंबित आहेत. बेहिशेबी मालमत्ता सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
५ घरे, १ भूखंड आणि एक गाळा - मालमत्तेच्या अधिक चौकशीत मीनल दळवी यांची तब्बल २ कोटी ६२ लाखांची संपत्ती समोर आली आहे. त्यामध्ये घरातून जप्त केलेल्या ऐवजासोबतच ५ घरे, १ भूखंड व १ व्यावसायिक गाळा अशी मालमत्ता उघड झाली आहे. ही सर्व संपत्ती पती कृष्णा दळवीच्या (वय ५५) नावे केलेली आहे. - कृष्णा यांचा टुरिस्ट बुकिंगचा व्यवसाय होता; मात्र त्यातून कोणत्याही प्रकारे नफा नसताना दाखविण्यासाठी तो व्यवसाय चालवला जात होता.
खोत यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर लेखी तक्रारही केली होती. या तक्रारीची दखल गांभीर्याने घेत नवी मुंबई लाच लुचपत पथकाने महिनाभर दळवी यांच्यावर पाळतही ठेवली होती. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी खोत यांना एजंट राकेश चव्हाण यांच्याकडे 2 लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले होते. ते पैसे आणण्यासाठी राकेश हा खोत यांच्या अलिबाग येथील रायगड बाजार समोरील एका मोबाईल या दुकानात गेला होता .खोत यांच्या कडून दोन लाख रुपये स्वीकारताना पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तहसिलदारांचे नाव सांगितले होते.त्यानुसार पथकाने तहसिलदार मीनल दळवी यांना अलिबाग तालुक्यातील गोंधळपाड्यातील बेवूड सोसायटीमधील निवासस्थानातून ताब्यात घेतले. या अचानकपणे घडलेल्या कारवाईने मीनल दळवी यांना धक्काच बसला त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यावरून संपूर्ण संपत्ती ही तहसीलदार मीनल दळवी यांनी शासकीय नोकरीला लागल्यापासून कमावल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवला आहे. त्यानुसार पती-पत्नीवर ए.पी.एम.सी. पो.स्टे. ठाणे गुन्हा रजि. नंबर ७३/२०२४भ्र.प्र.अधि. सन १९८८ (संशोधन सन २०१८) कलम १३ (१) (ब) सह१३ (२) व कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
