Home

पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; वारीच्या गर्दीत सोनसाखळी, मोबाईल चोरी करणाऱ्या ८९ संशयितांना अटक

  पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; वारीच्या गर्दीत सोनसाखळी, मोबाईल चोरी करणाऱ्या ८९ संशयितांना अटक


   पुणे (प्रतिनिधी)


 श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण पुणे शहर विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय झाले होते. मात्र, या भक्तीमय वातावरणाचा गैरफायदा घेत काही चोरट्यांनी गर्दीत चोरीचे सत्र सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वारकरी आणि भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या, मंगळसूत्रे तसेच मोबाईल फोन चोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत ८९ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

वारकऱ्यांच्या गर्दीत चोरट्यांचा डाव

पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील विविध भागांत चोरीच्या ११ घटनांची नोंद झाली आहे. यातील तब्बल ९ घटना हडपसर परिसरात घडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांचे मोबाईल आणि दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हडपसरसह समर्थ, विश्रामबाग, शिवाजीनगर, वानवडी आणि खडकी पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे शाखेची विशेष मोहीम

पालखी सोहळ्यातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष पथके तैनात केली होती. चार विशेष पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवून संशयितांची तपासणी सुरू केली. या कारवाईत एकूण ८९ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

६७ महिला आणि २२ पुरुषांचा समावेश

पोलिसांच्या ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये ६७ महिला आणि २२ पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांची सध्या चौकशी सुरू असून चोरीच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासात वारीच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी महिला आणि पुरुषांची टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त

पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. भाविकांनी गर्दीत मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Previous Post Next Post