Home

देवेंद्र फडणवीसांनी मोडला शरद पवारांचा विक्रम; महाराष्ट्राच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीसांनी मोडला शरद पवारांचा विक्रम; महाराष्ट्राच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी)

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत ते आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा विक्रम मागे टाकला आहे. 

१२ जुलै २०२६ पर्यंत फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा एकूण कार्यकाळ २,४३० दिवसांवर पोहोचला आहे, तर शरद पवार यांचा एकूण कार्यकाळ २,४१२ दिवसांचा होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत आता फडणवीस तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रथमच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी सलग पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करत राज्याचे नेतृत्व केले. पुढे २३ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या चर्चित 'पहाटेच्या शपथविधी'नंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र हा कार्यकाळ अवघ्या ८० तासांत संपुष्टात आला. त्यानंतर ५ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांचा हा कार्यकाळ सध्या सुरू आहे. या तिन्ही कार्यकाळांचा एकत्रित कालावधी आता ६ वर्षे ७ महिने, म्हणजेच २,४३० दिवस इतका झाला आहे.

दुसरीकडे, शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चार वेळा शपथ घेतली होती. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा एकूण कार्यकाळ सुमारे ६ वर्षे २२१ दिवस, म्हणजेच २,४१२ दिवस इतका राहिला. विशेष म्हणजे, चार वेळा मुख्यमंत्री होऊनही त्यांना एकदाही सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. याउलट देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कार्यकाळात सलग पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करत स्वतंत्र विक्रम नोंदवला होता.

महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अद्यापही वसंतराव नाईक यांच्या नावावर कायम आहे. त्यांनी ५ डिसेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सलग ११ वर्षे ७८ दिवस, म्हणजेच ४,०९६ दिवस राज्याचे नेतृत्व केले. त्यांच्या प्रदीर्घ आणि अखंड कार्यकाळाचा विक्रम आजही अबाधित आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख असून त्यांनी सुमारे ७ वर्षे १२९ दिवस, म्हणजेच २,६८६ दिवस मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आता देवेंद्र फडणवीस, तर चौथ्या क्रमांकावर शरद पवार यांचे नाव आहे.

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचणे हा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विशेष म्हणजे त्यांचा तिसरा कार्यकाळ अद्याप सुरू असल्याने त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत आणखी वाढ होणार असून भविष्यात हा विक्रम अधिक भक्कम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Previous Post Next Post