Home

नागाव पर्यटनाला सुरक्षिततेची नवी दिशा; ग्रामपंचायत–पोलीस प्रशासनाचा संयुक्त संवाद, व्यावसायिकांना नियमांचे मार्गदर्शन

 नागाव पर्यटनाला सुरक्षिततेची नवी दिशा; ग्रामपंचायत–पोलीस प्रशासनाचा संयुक्त संवाद, व्यावसायिकांना नियमांचे मार्गदर्शन

अलिबाग(प्रतिनिधी)

नागाव परिसरातील पर्यटन व्यवसाय अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि कायदेशीर चौकटीत राहावा, या उद्देशाने ग्रामपंचायत नागाव आणि अलिबाग पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन व्यवसायिकांची मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली. सरपंच सौ. हर्षदा मयेकर यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या बैठकीला हॉटेल, लॉज, होमस्टे, रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्स तसेच समुद्रकिनारी पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

बैठकीच्या प्रारंभी नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांनी पर्यटन व्यवसाय करताना कायद्याचे पालन, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी, शासनाच्या नव्या नियमावली, आवश्यक परवानग्या, नोंदवही आणि व्यवसायिकांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नियमांचे काटेकोर पालन केल्यास नागावची विश्वासार्ह पर्यटनस्थळ म्हणून असलेली ओळख अधिक बळकट होईल, असे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान उपस्थित व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी विविध अडचणी, शंका व सूचना मांडल्या. त्यावर पोलीस निरीक्षक पांडे यांनी सविस्तर उत्तरे देत संबंधित विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी नागावमध्ये येत्या महिनाभरात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असून ती लवकरच कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. या घोषणेचे उपस्थितांनी स्वागत केले.

या बैठकीस सरपंच सौ. हर्षदा मयेकर, उपसरपंच सौ. मंगल नागे, जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य निखिल मयेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, सर्कल अधिकारी तसेच नागावमधील पर्यटन व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समारोपाच्या वेळी सरपंच सौ. हर्षदा मयेकर यांनी पोलीस प्रशासन, उपस्थित व्यावसायिक आणि ग्रामस्थांचे आभार मानले. नागावला सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आदर्श पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाला सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Previous Post Next Post