Home

विनोद वास्तवाचे भान देतो...लेखक वसंत गिरी

 विनोद वास्तवाचे भान  देतो.                 


  मानवी स्वभावातील दोषाचे खेळकरपणे दर्शन घडवून तो दोष घालवण्यासाठी अत्यंत प्रेमाने समज देण्याचा उद्देश जेंव्हा विनोदनिर्मात्याचा असतो तेंव्हा खरोखरच त्याच्या मनात दोषी व्यक्ती विषयी आत्मियता असते.तिथे टवाळखोरी हा उद्देश  मनात ठेवून त्या व्यक्तीचे खच्चीकरण करणे हा दुष्ट हेतू असू शकत नाही.विनोदाच्या माध्यमातून मानवी जीवनातील अज्ञान,उणिवा  नष्ट करुन उत्स्फूर्तपणा वाढविणे हा हेतू असतो.जेवढ्या प्रमाणात मानवी जीवनातील बुद्धीमांद्य किंवा मेंदूतील जडत्व नष्ट करणे शक्य होईल, त्याप्रमाणात मानवी जीवनातील चंचलता वाढून बुद्धीतेज वाढेल.अत्यंत हळवी,अती भावनीक माणसे थोड्याशा कारणाने कमालीची दु:खीकष्टी होतात.सूडाने पेटून उठतात.त्यांच्यातील आसूरी प्रवृती जागृत होते किंवा वैफल्याच्या दिशेने जावून आपला जीवनमार्ग नकारात्मक दिशेने नेतात. याउलट विनोदी माणसे स्वत:वर विनोद करून घेण्यात धन्यता मानतात.माझ्यातील व्यंगामुळे मी सर्वांना हसवू शकलो हा त्यांच्या आनंदाचा विषय असतो.ते खोट्या प्रतिष्ठेची झूल घेवून कधी मिरवत नाहीत.कुणी सन्मान दिला तरी हुरळून जात नाहीत. सन्मान न दिला तरी त्यांच्यातील दिलखुलास प्रवृती मुळे तो क्षणही आनंदी बनविण्याचे सामर्थ्य त्यांच्या वर्तनात असते.             

           माणूस आपल्यातील दोष प्रभावीपणे सांगून इतरांना आनंद देतो.तो विनोद उच्च दर्जाचा असतो, पण यापलिकडे जाऊन मनुष्यजीवनातील उणिवा, दोष नाहिसे करण्याचा प्रयत्न करतो.मनुष्यप्रवृतीवर हल्ला करतांना कुणाला इजा पोहचणार नाही तर त्यालाआपल्या दोषाची जाणिव होईलं.विनोदविस्तार जेवढा अधिक तेवढा त्यात अधिक रंग भरला जातो असे काही विनोदी साहित्यिकांचे मत असले तरी खूप कमी शब्दातही मोठे विनोद होतात असे दिसून येते.उदा.आचार्य अत्रे एका सभेत " सभ्य गृहस्थहो " असे म्हणतात आणि एक वात्रट श्रोता लगेच जोरात ओरडतो,"ओऽऽ ". अत्रे पुढे त्वरित उत्तर देतात."मी तुम्हाला नाही म्हणालो."या त्यांच्या उत्स्फूर्त उत्तराने सभेत प्रचंड हशा निर्माण होतो.इथे अत्यंत कमी शब्दात सभा जिंकून घेण्याचं कसब उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आणि तो सभाप्रसंग वक्तृत्वविश्वात अजरा - मर झाला.इथे विनोदविस्तार हा प्रकार कुठे आहे?हा विनोदातील कोटीप्रकार,अशी समयसूचकता दाखविणाऱ्या व्यक्तीला संवादकौशल्य क्षेत्रात कोट्य -धिश होण्याचे भाग्य प्राप्त होते.लेखक ,वक्ता किंवा कलाकाराने मनुष्यजीवनातील सूक्ष्म विसंगती किंवा सुसंगती सर्व श्रोता ,वाचकासाठी शोधायची असते.  त्या सुसंगती,विसंगतीवर सर्वप्रथम लक्ष या वर्गाचे वेधलेले असते.जे अगोदर कुणाच्याही लक्षातआलेले नसते.इथे लेखक,वक्ता,कलाकारांच्या समयसूचक वृतीची कसोटी लागतेच पण इथे श्रोता,प्रेक्षक किंवा वाचक तेवढाच उत्स्फूर्त दाद देणारा असावा लागतो.

          एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदारांची कौटुंबीक माहिती भरण्यासंबधीची चर्चा सुरु झाली. शेकापचे केशवराव धोंडगे यांच्या एक मुलगा व एका मुलीविषयी माहिती भरण्यात आली नव्हती.संबधीत व्यवस्थेविषयी त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आणि  " माझ्या दोन अपत्याला का मारता ?"असा संतप्त सवालं केला.त्यावर मुख्यमंत्री शरद पवार साहेब म्हणाले."महाराष्ट्र सरकार लवकरच एक समिती नेमून सर्वे करेल आणि तुम्हाला नेमकी किती अपत्य आहेत?याचा शोध घेतला जाईल.धोंडगेसाहेब त्याची मुळीच चिंता नसावी." त्यावर सभागृहात एकच हास्य गडगडाट झाला.या ठिकाणी पवार साहेबांनी जी अनपेक्षित विसंगती साधली जी कोणाच्याही मनात यापूर्वी नव्हती.त्यामुळे वातावरणात खूप  प्रसन्नता आली.धोंडगेंच्या संतप्त सवालाला अशी मिश्किल शाब्दिक कोटी आरपार करुन टाकेल हे सर्वांसाठी अनपेक्षित होते.

        कोटीमध्ये शब्दचमत्कृती असते.त्यात गर्भित अर्थ असतो.चपखल शब्दयोजनेमुळे ती वातावरण प्रसन्न करते.तिचा संबध कल्पनाशक्ती व समय सूचकतेशी असतो.शाब्दिक वार खूप जलदगतीने करणे  इथे गरजेचे असते.कोटीमुळे उत्स्फूर्तपणे शब्दानंद मिळतो.त्यातून हास्यरस निर्माण होतो. शाब्दिक कोट्यामुळे होणारे वार प्रतिवार प्रचंड आनंददायी असतात.त्यामुळे वातावरणातील प्रसन्नता शतगुणित होते.त्या शब्दधनाच्या वर्षावाने हे कोट्यधिश विनोदवीर पृथ्वीवरच स्वर्ग निर्मिती करतात.असाच माझा स्वानुभव इथे मुद्दामच नमुद करावसा वाटतो. जाने.१९९१ चा कालावधी. अकोल्याच्या न्यू इंग्लिश स्कूल च्या प्रांगणात विदर्भ साहित्य संमेलनाचा सोहळा पार पडत होता. कवी- संमेलनातील रंगत वाढत चालली होती.परतवाडा येथीलं हास्यकवी राजाभाऊ धर्माधिकारी कविता सादर करण्यासाठी उभे राहिले.अकोला येथीलं सुप्रसिद्ध कवी,नामवंत साहित्यिक व बहारदार सूत्रसंचालक प्रा.नारायणराव कुलकर्णी कवठेकर सूत्रसंचलन करत होते,त्यांनी राजाभाऊंचा परिचय द्यायला सुरुवात केली."हे राजा धर्माधिकारी परतवाड्यावरुन आले आहेत.आपल्यासमोर कविता सादर करणार आहेत.' मारुतीची नोकरी ' यांनाच नोकरी नाही,पण हे मारुतीला नोकरी द्यायला निघाले आहेत."तर यांना ऐका.

            आता आमचा राजाभाऊ म्हणजे पहिलाच महावस्ताद.त्याले कुठी काय सुचीलं काहीच सांगता येत नाही ना भाऊ. ( थोडासाच वऱ्हाडीचा आस्वाद) राजाभाऊनं थोडी प्रस्तावना द्यायला सुरवात केली."                         आजच्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालक प्रा.नारायण- राव कुलकर्णी कवठेकर यांना असं लांबलचक नावं लावण्याचा भल्ला शोक.पण आमच्या वहिणीला असं मारोतीच्या शेपटासारखं नावं काही आवडायचं नाही.त्या यांच्या नावावर नेहमीच नाराजी व्यक्त करायच्या. एकदा मी कवठेकर सरांच्या घरी गेलो होतो.त्यांचा एक चुणचुणीत छोटा मुलगा समोर आला.त्याला मी विचारलं," बाळा तुझं नावं कायं?" तेंव्हा तो म्हणाला,"राजकुमार नारायणराव कुलकर्णी कवठेकर,असं बाबा म्हणतात,पण आई मात्र नाही म्हणते." या ठिकाणी कोट्याधिश राजाभाऊनं जी शाब्दिक कोटी साधली. त्यामुळं श्रोत्यामधून एकच हास्यस्फोट झाला.तो किमान पाचं मिनिटं तरी सुरु होता.काही श्रोते तर जमिनीवर लोळून लोळून पोट दुखेपर्यंत हस़त होते. तसा हास्यस्फोट मी माझ्या उभ्या आयुष्यात एकाही विनोदी कार्यक्रमात ऐकला नाही.फ्राॅइडनी सहेतुक कोटी व निर्हेतुक कोटी असे  वर्णन केले त्यातीलं हा सहेतूक कोटीचा प्रकार.या कोटीमुळे आकस्मिकपणे अनावर हास्यस्फोट होतो. त्यामागे निश्चित हेतू असतो,पण त्यापूर्वी झालेल्या वाराला प्रत्युत्तर देण्यासाठी ही सहेतुक कोटी राजा- भाऊंना आवश्यक वाटली आणि त्यामुळे त्या कवी संमेलनातीलं ते राजा ठरले.

            सहेतुक कोटी आक्रमक,उपहासगर्भ आणि बचावात्मक धोरण स्पष्ट करणारी असते.सहेतुक कोटीचे विशेषत्व कोटी करणाऱ्याला कोटीच्या शस्त्रा - नेच शिकार साधावी लागते.आपले सावज अचूक टिपने इथे महत्वाचे.शिकार चारचौघात व्हावी व ती पाहून चारचौघांनी आपली स्तुती करावी हा त्यामागे हेतू असतो.अत्रे व फडके यांच्या कालावधीत त्यांचे जे वाग्युद्ध व्हायचे.त्यात अशा कोट्या,प्रतिकोट्यांचा अनुभव वाचकांना व श्रोत्यांना प्रचंड प्रमाणात येत असे.उत्फूर्त कोटीत सहजता,चाणाक्षवृती,कल्पना शक्ती व बुद्धीवैभव असल्यास हास्यप्रवृती निर्माण होते आणि मन्मनातीलं भावविश्वात प्रसन्नता दरवळू लागते.त्यात मानवी मन उन्नत करणे हा हेतू असेलं तर दुग्धशर्करा योगच म्हणावा.

         आपल्या दैनंदिन जीवनात ज्या व्यक्तीजीवना- कडे दुर्लक्ष होते.अशा व्यक्तिची दखल घेवून त्याच्या वर्तनातील दोष खूप वेगळ्या पद्धतीने लक्षात आणून देणे.हे उपहासाचे प्रमुख कार्य होय.शारीरिक आणि मानसिक दोष,त्याशिवाय व्यक्तीवैशिष्ट्यातील अति- शयोक्तीपूर्ण हास्यास्पद शब्दचित्र उभे करणे.हे तंत्र उपहासाचे आहे.अत्यंत निरागसपणे अतिशयोक्तिचा वापर करुन समोरच्या व्यक्तीला खजिल करणे हा उद्देश त्यामागे असतो.एवढ्यात एका व्यक्तीचा मला फोन आला आणि माझी स्तुती करत करत तो अशा काही कल्पनारम्य जगात घेवून गेला.मलाही 'अल्ला उद्दिन आणि जादूचा दिवा ' या कथानकातील राक्षस आपल्यासमोर उभा आहे.तो आपल्या आदेशाची वाट पाहुन म्हणतोय,"हूकुम आका ".तुमच्यासारखा महान साहित्यिक तुमच्या परिसरात झाला नाही." असं फोनवर बोलणारी व्यक्ती मला सांगत होती. अशावेळीआपली औकातआपल्याला कळाली पाहिजे.स्वप्नातून जागे होऊन वास्तवात येता आले पाहिजे.याचीही जाणिव असली पाहिजे आपल्या परिसरात आपल्यापेक्षा साहित्य क्षेत्रात खूप मोठी माणसे आहेत.फरक फक्त एवढाच आहे.काही लोकमान्य आहेत.काही स्वंयघोषित आहेत,पण मोठी माणसे परिसरात रेकार्डब्रेक आहेत.जगात प्रत्येक माणूस स्तुतीप्रिय आहे.देवाला सुद्धा प्रसन्न करण्यासाठी नामस्मरण करावे लागते.याचा अर्थ असा,देवाला स्तुती आवडते असेच म्हणावे लागेल. मग हाडामासाच्या माणसाला तर स्तुती आवडनारचं. तरीसुद्धा माणसाला वास्तवात जगता आले पाहिजे. नसता उपहास आणि अतिशयोक्तीचा बळी ठरण्याचे दुर्देव नशिबी आल्याशिवाय राहत नाही.

     प्रा वसंत गिरी 9011229232/8482890991

Previous Post Next Post