Home

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आगरी समाज संस्थेचे पाऊल

 विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आगरी समाज संस्थेचे पाऊल


IES शाळा, वरसोली येथे करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियानाचा उत्साहपूर्ण शुभारंभ


अलिबाग(प्रतिनिधी)

 विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा मिळावी, शिक्षणातील विविध संधींची माहिती व्हावी आणि बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी व्हावी या उद्देशाने आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियानाची सुरुवात शनिवार दि. २० जून २०२६ रोजी IES शाळा, वरसोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. उपशिक्षणाधिकारी श्री. सुनील भोपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील यांनी छंद आणि करिअर यांमधील महत्त्वाचा फरक स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि कौशल्यांचा योग्य मेळ घालून करिअरची निवड करावी, असे सांगितले. तसेच अशा प्रकारच्या करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियानामागील सामाजिक उद्देशही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.

उपशिक्षणाधिकारी श्री. सुनील भोपळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना यशासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि दृढ इच्छाशक्ती यांचे महत्त्व पटवून दिले. तर प्रमुख मार्गदर्शक श्री. मिलिंद धोदरे यांनी दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक शाखा, व्यावसायिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना आणि करिअरच्या अनेक पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन भविष्यात विद्यार्थ्यांसमोर निर्माण होणारी आव्हाने आणि त्यासाठी आवश्यक कौशल्ये याबाबत मार्गदर्शन केले.

या अभियानाची सुरुवात IES शाळा, वरसोलीसारख्या सुंदर, स्वच्छ व शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण असलेल्या शाळेत झाल्याबद्दल संस्थेने समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण पाटील, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी आगरी समाज संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुनिल तांबडकर, मार्गदर्शक श्री. अनंत म्हात्रे, श्री. उदय म्हात्रे, श्री. तुषार थळे, श्री. मनोहर पाटील व युवा कार्यकर्ते कु. श्रेयस प्रभाकर ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शैक्षणिक कार्यक्रम समितीचे श्री. मिलिंद धोदरे, श्री. राजेंद्र पाटील, सौ. शुभांगी म्हात्रे, श्री. शशिकांत मिठागरी, श्री. जयवंत पाटील व श्री. प्रकाश मिठागरी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य, देणगीदार, सभासद आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे सुरू झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या अभियानांतर्गत अलिबाग तालुक्यातील सुमारे ५५ दहावी व बारावीच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना करिअर, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, जानेवारी २०२७ पर्यंत हा उपक्रम पूर्ण करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

कार्यक्रमादरम्यान आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीच्या प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही या करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, विविध शैक्षणिक संधींची माहिती जाणून घ्यावी आणि आपल्या पाल्यांना योग्य दिशा देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देण्याच्या आगरी समाज संस्थेच्या या प्रयत्नाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Previous Post Next Post