आळवणी
असा कसा महाग झालास वरुणराजा
अधिक ज्येष्ठात तुझे आगमनही लांबले
माझ्या पारायणात मी तुला आळविले
कळले ना मला, असे काय माझे चुकले
देवांच्या राजा इंद्रदेवा, ये ढगांवर आरुढूनी
लखाखणाऱ्या सौदामिनींचा लगाम खेचुनि
पडघमाच्या रौरवात हो मृद्गंधांची उधळणी
विरहार्त वसुंधरेला दे घट्ट प्रेम कवटाळणी
अनंता, काहिलीत होरपळली तुझी लेकरे
भेगाळली जमीन नी शुष्क जलस्त्रोते
नांगरल्या भू स पाहती उदास कोरडी लोचने
करपून गेल्या सुरकुत्या, फिकुटली बोटे
चूक आमुची, हवा दूषित इंधन ज्वलने केली
अती हाव लालसेपोटी जलसिमा लांघिली
उत्खनने गाभ्याची अग्नी पातळी उसळली
वृक्षतोडीने पर्यावरणाची हानी वर्धिली
पश्र्चातापे दग्ध झालो, उमगलो, सावरलो
नद्या जोडणी, जल संवर्धन करू लागलो
ठिबक सिंचन, वृक्ष लागवड करू लागलो
तुला पर्याय दुसरा नाही हे ओळखून चुकलो
घे लेकरांना कुशीत, घालून घे पदरात चूक भूल
बळीराजाच्या घरी, विझलेली, पेटवून दे चूल
ये रे ये रे पावसा, सावट दुष्काळाचे करी दूर
जीवन देई जीवनास नको पसरवू भस्माचा धूर
सुलक्ष्मी सुनील बाळगी,
ठाणे
७०४५३५०३०९