उत्तरसंध्या=संध्याकाळचा म्हणजेच वृद्धत्वाचा अनुभव
“आजी, पासवर्ड काय आहे वायफायचा?”
इंदू आजीने कपाळाला आठ्या घातल्या. “कसलं फाय? नळाला पाणी येतंय ना?”
सहा महिन्यांपूर्वी नातू साई आला होता अमेरिकेहून. ‘वर्क फ्रॉम होम’ मिळालं, म्हणून तीन महिने आजीकडे राहायचं ठरवलं. इंदू आजी 72 वर्षांची. नातू 26 चा. मध्ये 46 वर्षांची दरी. आणि ती दरी भरून काढायला घरात वायफाय नव्हतं.
निवृत्त शिक्षिका इंदू आजी. तिने चाळीस वर्षे मराठी शिकवलं आणि शेकडो मुलं घडवली. पण स्वतःचा मुलगा आणि सून अपघातात गेले तेव्हा 10 वर्षांच्या साईला आजीनेच वाढवलं. बारावीनंतर साई अमेरिकेत गेला. त्यानंतर आजी एकटी पडली.
सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले. साईने घरात वायफाय लावलं. आजीला स्मार्टफोन दिला. “आजी, व्हॉट्सॲप बघ. तुझ्या मैत्रिणींचा ग्रुप केलाय.”
आजीने फोन उलटा सुलटा केला. “यात माणूस कुठे? सगळी बोटं दिसतात.” साई चिडला.
समस्या तिथूनच सुरू झाली. सकाळी आजी 5 ला, देवपूजा, रेडिओ. साई रात्री 2 पर्यंत लॅपटॉपवर, सकाळी 10 ला उठणार. आजीला वाटायचं, “तो आळशी झाला.” साईला वाटायचं, “आजीची कटकट फार.”
एक दिवस आजीने डबा बनवला. मेतकूट भात, तूप. साई म्हणाला, “आजी, I don't eat carbs. मी salad मागवलंय.”
आजीचा चेहरा पडला. मेतकूट सासूबाईंनी शिकवलं होतं. साईच्या बाबाला आवडायचं. त्या दिवशी ती जेवायला बसली नाही.
साईला मीटिंग होती. आजी हळू पसायदान म्हणत होती. साईने दार लावून घेतलं. नंतर म्हणाला, “आजी, मीटिंगमध्ये डिस्टर्ब होतं. थोडं हळू म्हण ना.”
आजीला अपमान वाटला. “माझ्याच घरात मला नियम?”
हळूहळू एकाकीपण वाढलं. पूर्वी शेजारच्या वहिनी यायच्या. आता साईची मीटिंग असते म्हणून त्या येत नव्हत्या. टीव्ही लावला तर साई म्हणायचा, “आजी, सिरीयलचा आवाज कमी करा.” आजीने टीव्हीच बंद केला.
एका रविवारी साई बाहेर गेला होता. आजीने कपाट आवरलं. एक जुनी पत्राची पेटी सापडली. साईच्या बाबाचं पत्र होतं.
“आई, तुझ्या हातच्या वरण-भाताची चव अमेरिकेत नाही ग.” आजी रडू लागली. तेवढ्यात साई आला.
“काय झालं आजी, का रडतेस?”
“काही नाही रे साई, तुझ्या बाबाची आठवण आली.”
साई जवळ बसला. पण काय बोलावं कळेना. त्याने फोन काढला. आजीला वाटलं, ‘आता हा परत फोनमध्ये जाणार’. पण साईने फोन आजीसमोर धरला. “आजी, हे बघ, बाबाचा फोटो. मी स्कॅन करून ठेवलाय.”
आजीने फोटो बघितला. त्यात २५ वर्षांपूर्वीचा मुलगा होता. तिने साईचा हात धरला. तेवढ्यात लाईट गेली, वायफाय बंद. लॅपटॉपही बंद. “शिट!” तो चिडला.
आजी म्हणाली, “चल, गच्चीत जाऊ. लहानपणी तू तारे बघायला हट्ट करायचास. मी तुला गच्चीत ग्रह-ताऱ्यांच्या गोष्टी सांगायची.”
नाईलाजाने साई गेला. गच्चीत गार वारा, पूर्ण चंद्र, तारे होते.
साई गप्प बसला. मग म्हणाला, “आजी, मला येत नाही मराठी कथा. आय मीन, मी विसरलोय.”
“मग मी शिकवते,” आजी हसली. “पण तू मला फोन शिकव. व्हॉट्सॲपवर फोटो कसा पाठवायचा ते.”
तो सौदा झाला. रोज रात्री अर्धा तास आजी साईला ‘एक होता राजा’ सांगणार. साई आजीला ‘गुगल कसं करायचं’ ते शिकवणार.
पहिल्या दिवशी आजीने मैत्रिणीला “गुड मॉर्निंग” चा फोटो पाठवला. आनंदाने तिने साईला मिठी मारली. साईला आठवलं, लहानपणी तो शाळेतून पहिला आला की आजी अशीच मिठी मारायची.
हळूहळू बदल झाला. आजीने साईसाठी ‘क्विनोआ’ ची माहिती गुगलवर शोधली. साईने आजीला युट्यूबवर ‘भक्तिगीत’ लावून दिलं. आजी हेडफोन लावून ऐकायला लागली, म्हणजे साईच्या मीटिंगला त्रास नाही.
एक दिवस सोसायटीत कार्यक्रम होता. ‘आजोबा-आजी आणि नातवंडं’ स्पर्धा. साई आणि आजीने सहभाग घेतला. विषय: ‘जुना-नवा’.
स्टेजवर आजीने पसायदान म्हटलं. साईने त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन स्क्रीनवर टाकलं. शेवटी दोघांनी मिळून म्हटलं: “जो जे वांछिल तो ते लाहो”. टाळ्यांचा कडकडाट झाला. पहिलं बक्षीस मिळालं.
असं संवाद साधत तीन महिने संपले. साईची परत जायची वेळ आली. पॅकिंग करताना आजी शांत होती.
“आजी, मी महिन्यातून एकदा येईन. प्रॉमिस. आणि रोज व्हिडिओ कॉल.”
आजीने स्मार्टफोन उचलला. “मी पण शिकले बघ. तुझा डीपी ठेवला आहे.”
साईने पाहिलं. आजीच्या डीपीला दोघांचा फोटो. खाली स्टेटस: ‘माझा वायफाय’.
एअरपोर्टवर साई म्हणाला, “आजी, चावी.”
“कोणती रे?”
“घराची. आणि या हृदयाची,” त्याने हृदयाकडे बोट दाखवलं. “उत्तरसंध्या एकटेपणाची नसते, जर नवीन पिढीने जुनी चावी मागितली, आणि जुन्या पिढीने नवीन कुलूप उघडायला शिकवलं, तर.”
आजी हसली. डोळ्यात पाणी आलं, पण ते एकाकीपणाचं नव्हतं. ते तृप्तीचं होतं.
साई गेल्यावर आजीने सोसायटीच्या मुलांसाठी ‘गोष्टीचा क्लास’ सुरू केला. अट एकच: “गोष्ट ऐकल्यावर आजी-आजोबांना व्हिडिओ कॉल करायचा.”
खिडकीबाहेर संध्याकाळ होती. पण आजीने लाईट लावला नाही. तिने फोन उचलला, साईचा फोटो बघितला आणि मनाशीच पुटपुटली, “जनरेशन गॅप नसतो रे. फक्त ‘संवाद’ नावाचा पूल बांधायचा असतो. एकाने ‘आधी तू’ म्हटलं की भिंत पडते.”
शिवकन्या प्रा. सौ. श्रद्धा कौस्तुभ तारे
पनवेल, रायगड
मोबाईल क्रमांक 9665476999