Home

वसुंधरेचे पत्र.... लेखिका सुनंदा पांडे

 वसुंधरेचे पत्र


नमस्कार!!  रामराम!!  हॅलो S S!!  हा S Sय !!

ओय सत श्री अकाल जी!!  अस्सलाम आलेकुम !!

काय? पेचात पडलात ना मी कोण म्हणून?

इतक्या भाषा वापरून अभिवादन करते तर हीची भाषा आहे तरी कोणती?

Coool!  अहो ही माझी ओळखच आहे मुळी.  मी नाना भाषा, नाना संस्कृती, कित्ती कित्ती चालीरीती, विविध पेहराव या सर्वांना माझ्यात सामावून घेतले आहे.  मी सगळ्यांची आणि सगळे माझेच आहेत.  माझ्यावरच तर सर्वांचे अस्तित्व अवलंबून आहे.  मी तर असे म्हणेन की जोपर्यंत तुम्ही सर्व आहात तोपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही.

होय! मी पंचमहाभूतांमधील पृथ्वी बोलतेय.

वसुधा, धरती, मही, पृथा, मृदा, मला अशा अनेक नावांनी संबोधले जाते.  नावे अनेक असली तरी माझे काम मात्र एकच आहे.  निसर्गाचा समतोल राखण्यात मदत करणे.  आणि फक्त  मीच नाही तर आम्ही पाचही भावंडे म्हणजे मी (पृथ्वी), आप, तेज, वायू, आकाश, आम्ही सर्व मिळून या निसर्गाचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा आणि तुमच्यात स्थित असलेल्या पिंडाचा दोन्हींचा समतोल राखतो.  म्हणूनच 'पिंडी ते ब्रम्हांडी' ही उक्ती रूढ आहे.  तेच आमचे अंतिम साध्य आहे.  आम्ही भावंडे फक्त देणे जाणतो, घेणे नाही.

आता माझेच बघा ना तुम्ही मला काही दिले तरी मी त्यातून नवीन सृजन करून, जवळ काहीही न ठेवता तुम्हालाच देते.  "परोपकाराय सतां विभूतयः" हे सुभाषित जणू आम्हा भावंडांना पाहून लिहिले आहे.

तुम्ही मला जे आणि जेव्हढं द्याल, त्याच्या कितीतरी पट जास्त मी तुम्हाला देते. तुम्ही नाही दिलेत तरी राग नाही.  तुम्ही जे पेराल ते जास्त पटीने तुम्हाला परत करणे हेच माझे काम.  पण "पेराल तेच उगवेल" हे पण ध्यानात असू द्या.  तुम्ही सकस बी पेराल, चांगले पोषण द्याल, योग्य काळजी घ्याल तर एकाच दाण्यातून मी तुम्हाला भरभरून देईन.  पण निकृष्ट बी, अयोग्य पोषण असेल ना तर मी मनात असून सुद्धा तेव्हढ देऊ शकणार नाही.  

माझा प्रयत्न मात्र तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचाच असेल.  गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, "कर्मण्ये वाधिकरस्ते मा फलेषु कदाचन" माझे पूर्ण जीवन त्यावरच आधारित आहे.  

माझे कर्म आहे तुम्हाला जीवन देण्याचे, सृष्टीचे संतुलन राखण्याचे.  आणि मी ते माझ्यापरीने करीतच राहीन.   तुम्ही मला दुखवलत तरीही मी माझ्या लेकरांवर प्रेमच करणार.  

मला माहीत आहे माझ्या बहुतांश लेकरांच्या मनात माझ्याविषयी आदर आहे, मला ते मातेचा दर्जा देतात.  माझ्या अंगावर पाय देऊन उभे राहावे लागते म्हणून रोज सकाळी उठल्याबरोबर *पादस्पर्शं क्षमस्व मे* असे म्हणुन मला वंदन करतात.  माझे ऋण मानतात.

काही थोडीच लेकरं अशी आहेत की ती एकमेकात भांडतात आणि मला दुखावतात, मालकी हक्क दाखवतात.   त्यासाठी भांडतात आणि स्वतःचं आणि माझं पण नुकसान करतात.  

माझा त्यांच्यावर राग नाही.  मी बोलू शकत नाही व्यक्त होऊ शकत नाही म्हणून आज मी माझ्या समंजस लेकरांना सांगते की जे तुमचे अजाण बांधव आहेत त्यांना समजवा.  एकमेकांशी प्रेमाने रहा तरच या तुमच्या आईचे ऋण फिटेल.  आणि तुम्हालाही फायदाच होईल.

आणखी काय सांगू बाळांनो.  सुखी रहा. 

सदैव हित चिंतणारी

तुमची आई वसुंधरा


सुनंदा पांडे 

नागपुर

Previous Post Next Post