. . मी मी जल्लाद बोलतोय..
हो मी जल्लादच बोलतोय. खुन्याला फाशी स्तंभवधाकडे नेणारा, त्याच्या शेवटच्या श्वासाचा साक्षीदारअसलेला एक माणूसच बोलतोय. न्यायदेवतेच्या मंदिरातून, न्याय बुद्धीने, जज्ज साहेबांनी ऑर्डर सोडलीय,ह्या कैद्याला फाशीची शिक्षाच योग्य आहे. वकिलांनी आपापली बाजू मांडली न्याय निवाडा झाला. शेवटची शिक्षा सुनावली गेली,आता काम होतं माझं. .फाशीची शिक्षा ठोठावणारा नामा निराळा होतो पण, प्रत्यक्ष फाशीवर लटकावणाऱ्याचं मात्र नित्य मरण असतं. काही दिवसांपूर्वी खून करून कैद झालेल्या त्या खुन्याच्या डोळ्यात आग,खूनशीपणा ठासून भरला होता. ताठ मानेने बेरडपणे रगेल चालीने चालणारा तो गुन्हेगार,आता ह्या क्षणी दिनवाणा झाला होता. डोळ्यातल्या आगीच्या जागी अगतिकता,याचना,भीती होती. मग्रूरपणे चालणारी त्याची पावलं आता डगमगत,थरथरत होती कारण त्याला फाशीची शिक्षा ठोठावली गेलीय. आणि दुर्दैवाने त्याला वधस्तंभाकडे नेण्याचं ,क्रूरकर्म माझ्यावर सोपवलं गेलंय. तुम्हीच सांगा मी पण एक माणूसच आहे नां हो! लोण्यासारखं मऊ काळीज मला दगडा सारखं कठीण करावं लागतय. कां तर या वीतभर पोटासाठी बायका मुलांच्या सुखासाठी माझाही वाल्या कोळी झालाय. रामायण लिहिण्याचं पुण्यकर्म वाल्मिकी ऋषींनी केलं पण माझ्या आयुष्यात महाभारतच घडतंय. . फाशी दोरखंडाला तेल लावतांना, गुन्हेगाराला काळा बुरखा पांघरून वधस्तंभाकडे नेतांना मी पण आतून रडतोय. खून करणारा, नामानिराळा होतो न्याय निवाडा करून फाशीची शिक्षा देणारा वेगळा असतो पण कैद्याचा शेवटचा श्वास बंद करणारा मी,..मी,..स्वतःला गुन्हेगारच समजतोय. पण मग मनात येतं, आपल्या देशात असे गुन्हे घडलेच नाहीत तर.. तर.. कुणाच्याच माथी पाप लागणार नाही. तुमच्या हातून गुन्हे खून होणारच नाही पापाचे पाटेकरी तुम्ही होता आणि ओघाने नकळत का होईना तुम्हाला फासावर चढवण्याच्या पापकर्मात आम्हीही सामील होतो, हा सतत टोचणारा कांटा आमच्या मनांत कायमच रुतलेला आहे. तुमच्याकडून सुरू झालेलं हे गुन्ह्याचं 'मूळच' आपण उखडून टाकूया. तरच आपला देश सुखी, शांतता प्रिय होईल. असं मलावाटतं.
. मित्रांनो हात जोडून तुम्हाला अत्यंत कळकळीची विनंती, अशा मारामाऱ्या असे क्रूरकर्म करणे, एकमेकांच्या जीवावर उठून जीव घेणं, सोडायला हवंय नाही का! जोडलेलं तर जोडाचं आणि तुटलेलं आणखीन तोडू नका कारण शांतताप्रिय धोरण देशबंधूच्या हिताचं असतं. आणि आपल्या भारत मातेची ही लाख मोलाची शिकवणच आहे. ती अंमलात आणली ना तर आपण सगळेच सुखीहोऊया. किती छान शब्दात आपलं मनोगत ह्या पापभिरू जल्लादने आपल्यापुढे मांडलंय म्हणावंसं वाटतय, ह्यांचाही विचार आपण करायला हवा. ह्यांच्याकडेही लक्ष असू द्या ना राव,! जग धावतंय नुसतं धावतय, कुणालाच वेळ नाहीय्ये. पण पोटासाठी अशी नोकरी करणाऱ्यांच्या मनातला 'सल' आपण नको का शब्दात मांडायला!म्हणून हा लेखन पसारा मांडण्याचा उपद् व्याप केला आहे
लेखिका राधिका (माजगावकर) पंडित पुणे ५१ .
