Home

मुरुड पोलीसांकडून गुन्ह्याचा छडा,लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अल्तमश निसार शेणवी अटकेत


 मुरुड पोलीसांकडून गुन्ह्याचा छडा,लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त;आरोपी अल्तमश निसार शेणवी अटकेत.


रायगड (प्रतिनिधी )

 मुरुड तालुक्यातील वावडुंगी येथे राहणारे रामचंद्र सहदेव काते हे काही दिवसापूर्वी कामा निमित्ताने मुंबई येथे गेले होते, या संधीचा फायदा घेत आरोपी  अल्तमश निसार शेणवी वय ३२ वर्षे, रा. पेठ मोहल्ला मुरुड याने बंद घरात प्रवेश करून लाकडी कपाटात ठेवलेले 75 ग्राम सोने व इतर असा एकूण 10 लाख 50 हजार रुपयांचा येवज घेऊन पोबारा केला होता.

 सदरची तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात दाखल होताच कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी तपास सुरू करून आरोपीला मुद्देमालासह अटक करून त्याच्यावर घर फोडीचा गुन्हा दाखल करण्यात  यश मिळवले आहे.

 सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी  रामचंद्र सहादेव काते रा. वावडुंगी ता. मुरूड  हे त्यांच्या मुलाकडे मुंबई येथे गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचा फायदा घेवुन घरफोडी करून फिर्यादी यांच्या घरातील लाकडी कपाटामधील ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे घरफोडी चोरी करून नेले होते म्हणून दि:१७/०२/२०२६ रोजी वरील प्रमाणे मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 सदर गुन्हयाच्या अनुषंगाने   मुरुड पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते.  यावेळी मुरुड पोलीसांना  गोपनिय बातमीदारामार्फत आरोपीत अल्तमश निसार शेणवी वय ३२ वर्षे, रा. पेठ मोहल्ला मुरुड यानी घरफोडी केल्याची पक्की खबर मिळाली होती,

 आरोपीस मुरुड पोलीसांनी ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती, 

आरोपीत यानी चोरी करून नेलेले सोन्याचे  दागिणे त्याच्या सासरी राजपुरी येथील घराचे पोटमाळयावर असलेल्या सुटकेसमध्ये लपवुन ठेवले असल्याची कबुली दिल्याने  सदरचे दागिणे दोन सरकारी पंचाच्या समक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी  अल्तमश निसार शेणवी याला मुरुड न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीकडून सोन्याची चैन, मंगळसूत्र, सोन्याचे पान आदी वस्तू असा एकंदर 10 लाख 50 हजार रुपये माल ताब्यात घेण्यात आला आहे. 

 रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक श्रीम आँचल दलाल यांच्या प्रमुख  मार्गदर्शनानुसार  अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय  पोलीस अधिकारी . श्रीमती माया मोरे यांच्या सहकार्यातून मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे ,पोलीस उपनिरीक्षक   बळीराम डी. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना मोगरे,पोलीस हवालदार हरी मेंगाळ,पोलीस हवालदार अक्षय जाधव,गोपनीय वार्ता  विभाग पोलीस शिपाई मकरंद पाटील,पोलीस शिपाई सुधाकर बेले यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

तसेच मुरुड पोलीसांकडून नागरिकांना  घर बंद ठेवून बाहेर जाताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री जनार्दन गदमळे यांनी सदर ची माहिती दिली...

Previous Post Next Post