क्षणभर विसावा...
आयुष्याच्या या वळणावर
असाही एक क्षण असावा
अशांत मनाला सोडून देऊन
किंचित क्षणभर हवा विसावा
वळून पाहताना मागे
दिसे ना कुठलाच पुरावा
निसटून गेलेल्या क्षणांचा
हिशोब तरी का करावा
कालचक्राचा क्रूर काटा
पुन्हा एकदा उलट फिरावा
स्वप्नांना होण्या साकार
अल्लड,अलगद क्षण उतरावा
अंधारलेल्या मनात आता
स्रोत प्रकाशाचा पसरावा
याच प्रकाशात मजला
निर्मळ चेहरा माझा दिसावा
तपस्येचा आजवरच्या
दिवस तो आता फळावा
आसुसलेल्या मनास माझ्या
क्षण एक विश्रांतीचा मिळावा
सौ. भावना देवेंद्र नेमाडे.
