माझा भाऊराया
भाऊ माझा छत्र छाया
विसाव्याचा तो किनारा
माझे जपतो माहेर
हात पुढे तो आधारा
भेट प्रत्यक्ष ना नित्य
आम्ही आमच्या विश्वात
परि धाडता निरोप
धाव घेई संकटात
सण दिवाळीचा आला
येईल भाऊबीजेला
नक्षत्रांचे दिवे दारी
लावू त्याच्या स्वागताला
दारी रेखिली रांगोळी
रंग मनस्वी भरले
भुईनळे ते हर्षाचे
पहा अंगणी फुलले
ओवाळीते भाऊराया
बघ उजळल्या ज्योती
क्षण एक औक्षणाचा
दृढ करण्यास नाती
सौ. जयश्री देशकुलकर्णी
कोथरूड, पुणे-३८