आगरी समाज संस्थेतर्फे अलिबागमध्ये विनामूल्य बाल संस्कार वर्ग
अलिबाग (वार्ताहर)
आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या सौजन्याने व मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा (शाखा अलिबाग) यांच्या वतीने “विनामूल्य बाल संस्कार वर्ग” रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होत आहे.
हा वर्ग दर रविवारी सकाळी ९.०० ते १०.३० या वेळेत गावदेवी मंदिर, रामनाथ तळ्याजवळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात येणार आहे. या वर्गामध्ये ५ ते १२ वयोगटातील बालकांना सहभागी होता येईल.
या वर्गाद्वारे मुलांमध्ये संस्कार, चारित्र्य विकास, मूल्य शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास घडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या वर्गाचे मार्गदर्शन सौ. सुप्रिया प्रभाकर ठाकूर (९६५७२३४४८२) या करतील.
आगरी समाज संस्था अलिबाग ही समाजोपयोगी कार्यात अग्रेसर संस्था असून, संस्थेच्या माध्यमातून विवाहमिलन वधू-वर परिचय केंद्र, करिअर मार्गदर्शन, वृक्षारोपण व संवर्धन, पुस्तक पेढी, नोकरीविषयक सूचना मंच, तसेच प्रस्तावित आगरी समाज भवन या उपक्रमांसह विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य राबवले जात आहे. बालसंस्कार वर्ग हे त्याच समाजसेवेच्या परंपरेतील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील (९५२७३०८१३३) यांनी केले.
