Home

मालवणी मनाचा नाटककार हरपला; 'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर यांचे निधन


 मालवणी मनाचा नाटककार हरपला; 'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर यांचे निधन

*मुंबई(प्रतिनिधी )

 मराठी रंगभूमीवरील एक तेजस्वी नाव, मालवणी नाटकांचा पाया रचणारे प्रतिभावान जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर (वय- ८६) यांचे सोमवारी निधन झाले. दहिसर (पूर्व) येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. काल सोमवारी रात्री प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यविश्वाने एक सर्जनशील, लोकभाषेचा प्रामाणिक पुरस्कर्ता गमावला आहे. कोकणातील बोलीभाषेला कलात्मक रूप देऊन, तिला मुख्य प्रवाहात आणणारे गवाणकर हे नाव म्हणजे मराठी नाटकाच्या इतिहासातील एक अविभाज्य अध्याय आहे. मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांची स्वतंत्र लाट निर्माण करण्याचे श्रेय गवाणकर यांना जाते. ‘वेडी माणसे’ हे त्यांचे पहिले नाटक असून, त्यानंतर ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ यांसारखी अनेक नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या लेखनात विनोद, व्यंग आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ आढळतो. ‘वात्रट मेले’ या नाटकाचे तब्बल दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले, तर ‘वन रूम किचन’ या नाटकाने हजारावर प्रयोगांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.


्त्यांचे सर्वांत गाजलेले नाटक म्हणजे ‘वस्त्रहरण’. या नाटकाने मराठी रंगभूमीवर मालवणी भाषेची प्रतिष्ठा वाढवली आणि मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखा मालवणी नटसम्राट घडवला. वस्त्रहरणचे तब्बल पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले आणि या नाटकाचे प्रदर्शन दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या ‘भारत रंगमहोत्सव’मध्येही झाले. त्या काळातील अनेक गाजलेल्या किश्श्यांना साठवून ठेवणारे त्यांचे आत्मकथन ‘व्हाया वस्त्रहरण’ हे पुस्तक रसिकांच्या मनात आजही लोकप्रिय आहे. त्याचबरोबर ऐसपैस हे त्यांचे आणखी एक उल्लेखनीय लेखन म्हणून ओळखले जाते. सन १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवरील प्रवासाची सुरुवात ‘बॅकस्टेज’वरून केली. त्याच काळात ते ‘एमटीएनएल’मध्ये नोकरी करीत होते, पण नाट्यकलेवरील त्यांचे प्रेम इतके प्रखर होते, की नोकरीसह त्यांनी रंगभूमीशी घट्ट नाते जोडले. गवाणकर यांनी दारिद्र्य आणि संघर्ष यांना कलात्मकतेने रंगमंचावर आणले.

Previous Post Next Post