भाऊचा धक्का–रेवस बोटसेवा पुन्हा सुरु! पावसाळ्यानंतर पर्यटकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा
अलिबाग - अमुलकुमार जैन
साडेचार महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर भाऊचा धक्का ते रेवस सागरी प्रवासी बोटसेवा शुक्रवार, १० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. सकाळी ६.३० वाजता पहिली बोट भाऊचा धक्का येथून सुटली असून, दुपारी ४ वाजेपर्यंत नियमित फेऱ्या चालणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव शराफत मुकादम यांनी दिली.
पावसाळ्यात सुरक्षा कारणास्तव बंद
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात समुद्रात तीव्र वारे, उंच लाटा आणि खराब हवामानामुळे ही सेवा जुलै महिन्यात तात्पुरती बंद करण्यात आली होती.
गेटवे-मांडवा आणि मोरा-भाऊचा धक्का या मार्गावरील सेवा दोन महिन्यांपूर्वीच पुन्हा सुरु करण्यात आल्या, मात्र प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाऊचा धक्का-रेवस मार्ग अजूनही थांबवण्यात आला होता.
वेळापत्रकात हवामानानुसार बदल शक्य
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, परतीच्या पावसामुळे काही प्रमाणात हवामानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ किंवा वादळजन्य स्थिती निर्माण झाल्यास वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो, असं जलवाहतूक संस्थेने स्पष्ट केलं आहे.
प्रवाशांना आणि पर्यटन व्यवसायाला दिलासा
या बोटसेवेच्या पुन्हा सुरूवातीनं मुंबई-अलिबाग मार्गावरील नियमित प्रवासी, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सागरी मार्ग सुकर झाल्याने कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यवसाय व किनारी भागातील आर्थिक हालचालींनाही गती मिळणार आहे.
एक नजर सेवेसंदर्भातील महत्त्वाच्या बाबींवर:
पहिली फेरी: सकाळी ६:३० – भाऊचा धक्का येथून
शेवटची फेरी: दुपारी ४:००
मार्ग: भाऊचा धक्का ⇌ रेवस
सेवा सुरुवात: शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५
विश्रांती कालावधी: साडेचार महिने (पावसाळ्यामुळे)