Home

कोजागिरी..... अभंगकार प्रविण म्हात्रे

 कोजागिरी


सागर मंथने । लक्ष्मी प्रगटन ।

पौर्णिमेचा दिन । अश्विनाचा ।।१।।


पौराणिक कथा । सुरस ती सारी ।

या दिनी भूवरी । लक्ष्मीवास ।।२।।


कोण तो सजग । कोण ज्ञानातूर ।

पाहण्या संचार । लक्ष्मी करी ।।३।।


सकलांना पुसे । ती कोजागरती ।

म्हणुनी म्हणती । कोजागिरी ।।४।।


लक्ष्मी उपासना । होई या दिनाला ।

पुजती चंद्राला । लक्ष्मीसवे ।।५।।


पूजेची सांगता । दूध नैवैद्याने ।

चांद्रकिरणाने । युक्त ऐसा ।।६।।


शरद पौर्णिमा । म्हणतात काही ।

ऋतूत ती येई । म्हणूनची ।।७।।


या दिनी चंद्रमा । सर्वात जवळ ।

शास्त्र ते खगोल । सांगतसे ।।८।।


निसर्गाबद्दल । कृतज्ञतेस्तव ।

नवान्न पुनव । वदतात ।।९।।


या दिनी करती । नवान्न पक्वान्न । 

नवीचे तोरण । मुख्यद्वारी ।।१०।।


खानपान सेवा । मैफिली झकास ।

उदंड उल्हास । प्रत्येकात ।।११।।


पुराणे विज्ञाने । ख्याती असे तिची ।

प्रिय ती सर्वांची । कोजागिरी ।।१२।।


श्री. प्रविण शांताराम म्हात्रे .

Previous Post Next Post