Home

व्यसन.... लेखिका सुनिता तागवान


 व्यसन 


             या जगात अशा कितीतरी वस्तू आहेत की ,ज्या प्राशन केल्या किंवा खाल्ल्या तर अंगात वारं शिरावं तशी नशा शिरते. नशेत मनुष्य बेभान होतो. त्याला स्वतः लाच सावरता येत नाही...ना नीट चालता येत ना नीट बोलता येत....पैशाची बरबादी होते ते वेगळे. व्यसनी माणसाला समाजात मान सन्मान राहत नाही. काही कुटुंबात व्यसनामुळे रोजही पती पत्नीची भांडणं होत असतात...कधी कधी ही भांडणं इतकी काही विकोपाला जातात की, त्यांना घटस्फोट घेऊनच समाधान मिळते. व्यसनी माणूस मनाई करणाऱ्यांचा खून देखील करायला मागेपुढे बघत नाही....व्यसन कोणतेही असेल तरी ते चांगले नाहीच.

             आपल्या देशात अनेक ठिकाणी दारू, ताडी, तंबाखू ,खर्रा, गुटखा,विडी,सिगारेट,गांजा,चरस ,अफू ,हेराँईन,कोकेन अशा कितीतरी वस्तूंची आवक जावक बिनविरोध सुरू आहे. काही ठिकाणी तर सर्रास विक्री केली जाते. आजकाल फक्त पुरूषच नव्हे तर स्त्रिया आणि तरूण मुलं देखील वेगवेगळ्या अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहेत. विविध काँलेजात मादक पदार्थाचा व्यापार आजकाल खूप जोरात वाढलेला आहे. कितीतरी शैक्षणिक संस्थांमध्ये ड्रग्स सप्लाय होत आहेत. त्यामुळे आजची तरूण पीढी, जी उद्याच्या देशाचे उज्वल भवितव्य आहे..त्यांचे आयुष्यच धोक्यात आले आहे. काहींना इतके व्यसन जडले आहे की, तरूण मुलं मुली घरी चोरी करायला लागले...पालकांनी पैसे न दिल्यास कधी कधी ती हिंसक होतात तर कधी स्वतःच या जगाचा निरोप घेतात.

           व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी देशात ठिकठिकाणी व्यसनमुक्ती सारखे अभियान राबविण्यात येत आहेत. काही ठिकाणी समुपदेशन केले जाते तर काही ठिकाणी व्यसन बंद करण्यासाठी काही औषधी व उपचार पद्धती सुरू झाली आहे. समंजस नागरिकांनी लोकांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगून वेळीच सावध केले पाहिजे... अन्यथा विविध आजाराला बळी पडून लोकांची सुंदर स्वप्ने धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. खरे तर या नशा देणाऱ्या मादक व अंमली पदार्थांची विक्री बंद करायला हवी. राष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली गेली पाहिजे. जोपर्यंत शासन मनावर घेत नाही तोपर्यंत काहीच शक्य नाही.. बाहेरून अंमली पदार्थ आलीच नाही तर मग सर्व प्रश्न आपोआपच कमी होतील. काँलेजमधे पालकांनी जागृती अभियान राबवायला हवे. घरी मुलांशी प्रेमाने बोलून त्यांना या व्यसनापासून दूर रहाण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. घरातील कर्त्या पुरूषांने स्वतः कोणतेही व्यसन करू नये. मोठ्यांचेच अनुकरण लहान मुले करीत असतात. तेव्हा घरातील मोठ्या व्यक्तींनी स्वतः व्यसनापासून दूर राहायला हवे.. लहाणपणापासूनच मुलांना व्यसन किती वाईट आहे हे पटवून दिले पाहिजे. मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावायला हवी जेणेकरून ते कधीच दारू , सिगारेट ला स्पर्श सुद्धा करणार नाही. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही आपल्या घरातून होत असेल तर त्या घरची मुले कधीही वाईट मार्गाला जाणार नाही.

               आजकाल शाळेकरी मुले मुली रोज खर्रा खाऊन मौज करीत आहेत. काँलेजची मुलं मुली खुलेआम सिगारेट ओढतांना दिसतात. स्मोकींग केल्यास कोणते दुष्परिणाम होईल याची पुरेपूर जाणीव असूनही आज ही नवी पीढी नशेत झिंगून धुंद झाली आहे. तंबाखू, खर्रा,गुटखा खाल्ल्याने कर्करोग होतो. दारू पिल्याने लिव्हर खराब होते. स्मोकींग केल्यास फुफ्फुसे काळी पडून निकामी होतात...इतके जिवघणे आजार होऊन देखील नशा करण्याचे प्रमाण वाढतच आहे. थोडक्यात काय तर , नशा करणे म्हणजे, वेगवेगळया आजारांना बळी पडून आपलेच आयुष्य आपल्याच हाताने कमी करणे होय. दारू मुळे आज कितीतरी कुटुंबाचा आधार हरवला आहे. तरूण मुले जीवाला मुकली आहेत.. कित्येकांच्या घरातला कुलदिपक मावळला आहे. आईवडिलांचा भविष्याचा आधार आज कोलमडून पडला आहे. आज समाजातील वास्तविकता अत्यंत भयानक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना व्यसनाच्या मार्गी कोण लावत आहे, त्यांचा शोध घेऊन त्या व्यक्तीला कठोर दंड ठोठावला पाहिजे.. जेणेकरून इतरही घाबरून विद्यार्थ्यांना भटकवू शकणार नाही.

       काही लोकांना  जुआ, लाँटरी, शर्यत यांचे देखिल गंभीर व्यसन जडले आहे. लोभापायी आज कित्येक घरे देशोधडीला लागली आहेत. अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. म्हणून मनुष्याने स्वतः च्या मनावर ताबा ठेवला तर सर्व गोष्टींना मर्यादा येते. तेव्हा स्वतः च्या मनावर ताबा ठेवून व्यसनाला दूर ठेवणे सुद्धा आपल्याच हाती आहे..पुढील जीवन चांगल्याप्रकारे जगायचे असेल तर आजच व्यसनाला टाटा बाय बाय करणे कधीही चांगले.


लेखन,

सौ.सुनिता तागवान

साहित्यिका, सामाजिक कार्यकर्ता

आरमोरी जिल्हा गडचिरोली 


Previous Post Next Post