Home

राज्यात १३ जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार


राज्यात १३ जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मुंबई

 राज्यात मे महिन्याच्या अखेरीस धडकलेल्या मान्सूनने आता ब्रेक घेतला आहे. नागरिकांना पुन्हा पावसाचे वेध लागले आहेत, परंतु हलक्या पावसामुळे त्यांची निराशा होत आहे. तर बळीराजाही आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. यातच हवामान खात्याने यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. १३ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सूचित केले आहे.

हवामान विभागाने राज्यातील काही भागांत ९ आणि १० जून हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस बरसण्याचीही शक्यता वर्तवली आहे. तर कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम सरींचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे घाट परिसरात आणि इतर काही जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, वाऱ्यांची सीमा कायम असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. यामुळे सोमवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभाग आणि मराठवाड्यातही मेघगर्जना आणि ४० ते ५० किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. 

परिणामी जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पावसाने सध्या ब्रेक घेतल्याने मुंबईसह अनेक भागांत उकाडा जाणवत आहे. शुक्रवारी तुरळक ठिकाणी काही वेळ जोरदार सरी पडल्या, तर उर्वरित मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होते. सध्या तापमानाचा पारा फारसा चढा नसला तरी ढगाळ वातावरण कायम आहे, त्यामुळे पुन्हा उकाड्याची जाणीव होत आहे. वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

Previous Post Next Post