राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता; कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई
वेळेच्या आधीच दाखल झालेल्या मॉन्सूनने मंगळवारी महाराष्ट्र व्यापला आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यात पुढील चार दिवस धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. २० आणि २१ जून रोजीही या भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. १९ जून रोजी ठाणे आणि मुंबईत जोरदार सरी कोसळतील, तर २०-२१ जून रोजी पावसाचा जोर कमी होऊन मध्यम पाऊस पडेल. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस, तर २० आणि २१ जून रोजी मध्यम पाऊस अपेक्षित आहे. नाशिक घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल, त्यानंतर मध्यम पाऊस सुरू राहील.
पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल. नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये दोन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. जळगावातही याच काळात वादळी पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. हवामान खात्याने कोकण आणि घाटमाथ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.