पांगरी येथे मृतावस्थेत बिबट्या आढळला; संगमेश्वर तालुक्यात उडाली खळबळ
देवरूख
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे गावपऱ्यानजीक पायवाटेशेजारी काल गुरूवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या बिबट्याच्या मानेजवळ जखम असल्यामुळे दोन बिबट्यांच्या झटापटीमध्ये या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पांगरी गावातील सुहास जोशी हे गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणाकडे पायवाटेने जात असताना त्यांना पायवाटेशेजारी मृत बिबट्या दिसून आला. ही खबर त्यांनी गावचे सरपंच सुनील म्हादे यांना दिली. म्हादे यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. यानंतर वनविभागाचे रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वरचे प्रभारी वनपाल न्हानू गावडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जावून मृत बिबट्याची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सरपंच सुनील म्हादे, पोलीस पाटील श्वेता कांबळे, निलेश मुळ्ये, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.
यांनतर पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत या बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे कारण स्पष्ट होणार आहे. या बिबट्यावर वनविभागामार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले. हा बिबट्या नर जातीचा असून दोन वर्षाचा आहे. दरम्यान, बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या जंगलतोडीमुळे बिबट्या मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढल्याचे वन्यप्रेमींमधून बोलले जात आहे. वनविभागाने यावर वेळीच उपाययोजना करावी, व वनप्राण्यांचा अधिवास वाचवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
