खाजगी रुग्णवाहिकांचा गोरगरीब रुग्णांवर आर्थिक हल्ला…भावनिक प्रसंगातही अवाजवी भाडेवसुलीचा अट्टहास!
अलिबाग (ओमकार नागावकर)
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा मानली जाते. परंतु काही खाजगी रुग्णवाहिका चालक आणि संस्था याच सेवेचा बिनधास्त गैरफायदा घेत असून, रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट सुरु केली आहे. संकटाच्या क्षणी हतबल झालेल्या कुटुंबियांची मजबुरी ओळखून मनमानी दर आकारले जात आहेत.
रुग्णवाहिकांचे दर ठरलेले असतानाही रात्रसेवा, वाहतूक कोंडी किंवा तत्काळ सेवेच्या नावाखाली अवास्तव भाडेवसुली केली जाते. काही ठिकाणी फक्त अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी तब्बल तीन ते पाच हजार रुपये वसूल केले जात आहेत. रुग्णवाहिकेची मागणी जास्त आणि उपलब्धता कमी असल्याने नातेवाईक मिळेल ती गाडी भाड्याने घेण्यास भाग पडतात. हीच कमजोरी हेरून अनेक चालक रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः गळा कापणाऱ्या दराने सेवा देत आहेत.
या मनमानी भाडेवसुलीवर कुठलाही अंकुश नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. याबाबत नितीन वामन वाडेकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना भेटून लेखी निवेदन सादर केले. खाजगी रुग्णवाहिकांच्या भाडेदरांवर नियंत्रण आणावे, दर निश्चित करावेत आणि सर्वच रुग्णवाहिकांमध्ये अधिकृत दरपत्रक लावण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
परिवहन विभागाकडून या मागणीची दखल घेत लवकरच दरनिश्चिती करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र केवळ आश्वासनावर न थांबता तात्काळ कठोर अंमलबजावणी करावी, अन्यथा ही अवैध लूट थांबणार नाही, अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे.

