चौल पंचक्रोशीत ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम.
अलिबाग (ओमकार नागावकर)
ज्येष्ठ नागरिक संस्था, चौल यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल उचलत दिनांक १५ जून रोजी कातळपाडा तलाव परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमात संस्थेच्या सर्व सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमात बदाम, साग, जांभूळ, पिंपळ, आंबा, काजू यासारख्या विविध फळझाडांची व औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली. ही सर्व रोपे या परिसरातील हवामान व जमिनीस अनुरूप अशी निवडण्यात आली असून भविष्यात या वृक्षांमुळे परिसरास हरित आच्छादन व सौंदर्य लाभणार आहे.कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सतीश मनोहर, सचिव देवानंद पोवळे, दिपक तळेकर यांच्यासह संस्थेचे सर्व सदस्य व महिला सदस्य स्वाती, संगीता आणि विनताताई (नानी) यांनीही सक्रिय सहभाग घेतला. वृक्षारोपण करताना सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली व भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या रोपांची निवड, लागवडीसाठी लागणारे साहित्य तसेच चहा-नाश्त्याची संपूर्ण व्यवस्था संस्थेचे सदस्य श्री. चंद्रकांत थळे यांनी कुशलतेने पार पाडली. त्यांच्या नियोजनामुळे हा उपक्रम अत्यंत सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडला.
वृक्षारोपणासोबतच पर्यावरण जागृतीचा संदेश देत संस्थेने समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे. परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

