प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची प्रकृती खालावली; अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सहावा दिवस
अमरावती
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांचं गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केल आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. बच्चू कडू यांची प्रकृती पूर्णपणे खालावली असून त्यांना उठून बसण्यासाठी त्रास होत आहे. सकाळी बच्चू कडू यांना उलट्या झाल्याचंही सांगितलं जात आहे. जेवण न केल्याने बच्चू कडू यांचे वजन चार किलो पेक्षा अधिक किलोने घटलं आहे.
दरम्यान तिवसा उपजिल्हा रुग्णालयाच्या चमूकडून बच्चू कडूंच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली आहे. बच्चू कडूंनी औषधोपचार घ्यावा, ऍडमिट व्हावं, असा डॉक्टरांचा सल्ला आहे. मात्र बच्चू कडूनी वैद्यकीय औषधोपचार नाकारल्याची माहिती आहे. शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन, वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बच्चू कडूंच्या या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला आता राज्यातूनही अनेक नेते मंडळी आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. सरकार दरबारी सुद्धा हे आंदोलन मागे घेण्यासंदर्भात चर्चेचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हे आंदोलन कडू यांनी मागं घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. पण, सरकारचे पहिले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सरकार पक्षातर्फे विनंती घेऊन आलेल्या मृदू आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना रित्या हातानेच परतावे लागले. सरकारचे पहिले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सरकार पक्षातर्फे विनंती घेऊन आलेल्या मृदू आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. यावेळी राठोड यांना कार्यकर्त्यांचा संताप सहन करावा लागला. राठोड यांनी कडूंच्या मागण्या तातडीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मांडतो. त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली खरी, मात्र बच्चू कडूंनी ती फेटाळून लावल्याने उपोषणस्थळावरून बाहेर पडताना कडूंच्या कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांच्यासमोरच 'संजय राठोड हाय हाय'च्या घोषणा दिल्या.
