झणझणीत मराठमोळ्या मिसळचा जगात सन्मान; जगभरातील 50 सर्वश्रेष्ठ ब्रेकफास्टमध्ये मराठी ‘मिसळ’ चा समावेश
मुंबई(प्रतिनिधी)
भारतातील जिभेचे चोचले पुरवणाऱ्या रेसिपीत मराठी माणसाला वडापाव नंतर नक्कीच झणझणीत मिसळही आवडत असेल. आता ही मिसळ जगातील 50 सर्वोत्कृष्ठ स्वादिष्ठ नाश्त्यात समाविष्ठ झाली आहे. भारतातील तीन खाद्यपदार्थांची 50 सर्वश्रेष्ठ ब्रेकफास्टमध्ये निवड झाली आहे. टेस्ट अँटलास या वेबसाईटने ही यंदाची यादी तयार केलेली आहे.
सुप्रसिद्ध फूड गाईड टेस्ट अँटलासने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘जगातील 50 सर्वोत्तम ब्रेकफास्ट’ यादीत भारताच्या तीन पारंपरिक पदार्थांनी स्थान मिळवले आहे. मिसळ, छोले भटुरे आणि पराठा हे ते तीन पदार्थ होत. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्राच्या झणझणीत मिसळने थेट टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राचा पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ मिसळ या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. अंकुरित मटकीपासून बनलेली, तिखट रस्सा आणि फरसाणसह सर्व्ह केली जाणारी मिसळ, कांदा, लिंबू आणि पावासोबत खाल्ली जाते. मिसळ ही केवळ चविष्ट नव्हे, तर विविध टेक्स्चर असलेला एक ‘फ्लेवरचा स्फोट’ आहे. तोंडाला झणझणीत लागणारी, पण पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी ही चव म्हणूनच महाराष्ट्रभर प्रचंड लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर आणि स्ट्रीट फूड कार्यक्रमांमुळे मिसळची लोकप्रियता आणखी वाढली आहे. महाराष्ट्रातील अनेक खवय्ये मिसळला ‘ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स’ मानतात.
या यादीत छोले भटुरे 25 व्या क्रमांकावर आहे. उत्तर भारतातील अस्सल आणि खास पदार्थ छोले भटुरे. फुलपंखी तळलेले भटुरे आणि झणझणीत, मसालेदार छोले हा दिल्लीतल्या लोकांचा ‘ओरिजिनल ब्रेकफास्ट’ मानला जातो. ओल्ड दिल्लीच्या गल्लीपासून ते पंजाबी घराघरांत, छोले भटुरे अनेक पिढ्यांपासून ब्रेकफास्टचा बादशहा ठरला आहे. या यादीत 25 व्या क्रमांकावर आलेला पदार्थ म्हणजे पराठा. अगदी कोणत्याही प्रकारच्या सारणासह बनवले जाणारे पराठे भारताच्या प्रत्येक भागात वेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात. दही, लोणी, लोणचं किंवा अगदी चहा सोबतही त्याची जोडी जुळते. TasteAtlas ची ही यादी प्रेक्षकांच्या मतांवर आणि अन्न तज्ज्ञांच्या परीक्षणावर आधारित असते. यादीत पारंपरिक युरोपीय किंवा पूर्व आशियाई पदार्थांचा वरचष्मा असतो, त्यामुळे भारताच्या स्ट्रीट फूड ब्रेकफास्टने यात स्थान मिळवणं ही मोठी गोष्ट आहे.
