Home

वानखेडेवरील स्टँडला शरद पवार, रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांचे नाव



वानखेडेवरील स्टँडला शरद पवार, रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांचे नाव


मुंबई(वार्ताहर)

वानखेडे स्टेडियममध्ये आज एक भव्य सोहळा पार पडला. टीम इंडियाचा हिटमॅन, मुंबईचा अभिमान रोहित शर्मा याच्या नावाने स्टँडचं नामकरण करण्यात आले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला. या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थित होते. याचवेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाने देखील स्टँडचं नामकरण झाले. तसेच एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसीए ऑफिस लाउंजचं उद्घाटन झाले. 

रोहितसह मुंबई क्रिकेट असोसिएशन माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचंही स्टँड दिसणार आहे. त्यासह भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे नावही एका स्टँडला दिले गेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयामुळे वानखेडे स्टेडियमच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक पर्व सुरू होणार आहे. वानखेडे स्टेडियम, जिथे रोहितने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, तिथे आता रोहित शर्मा स्टँड म्हणून ओळखले जाणारे स्टँड असेल. वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावावर स्टँड आहेत आणि रोहितचे नावही त्या यादीत जोडल्या गेले आहे. 

या कार्यक्रमात रोहित शर्माने आपल्या भाषणात सर्वांचे आभार मानले. तसेच आपल्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये एक वॉल असणं हे आपल्यासाठी खूप स्पेशल असल्याची भावना रोहित शर्माने बोलून दाखवली. माझ्यासाठी हे खूप स्पेशल आहे. वानखेडे हे माझ्यासाठी खूप आयकोनिक स्टेडियम आहे. वानखेडे सोबत खूप आठवणी निर्माण झालेल्या आहेत. वानखेडे स्टेडियममध्ये कीर्तीवंत खेळाडूंचा सन्मान म्हणून इथे वॉलवर त्यांचं नाव देण्यात आलंय. जगातील ज्येष्ठ राजकारणी यांचंही नाव इथे एका स्टँडला देण्यात आलं आहे. अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या पंक्तीत मला स्थान देवून माझा सन्मान करण्यात आला. 

त्यामुळे मी एमसीएच्या सर्व सदस्यांचा खूप आभारी आहे. एमसीएमचे अजिंक्य नायक, संजय नायक, अरमान भाई यांचा आभारी आहे", असं रोहित शर्मा म्हणाला. मी दोन फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तरीही मी आजही एका फॉर्मेटमध्ये खेळतोय. माझ्यासाठी 21 तारखेला जेव्हा मी वानखेडे स्टेडियममध्ये खेळायला येईन तेव्हा माझ्यासाठी ती खूप स्पेशिल भावना असेल. येत्या 21 तारखेला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना होणार आहे. त्यावेळी मी याच मैदानावर खेळायला येईन आणि त्यावेळी इथे माझ्या नावाने स्टँड असेल ही माझ्यासाठी खूप स्पेशल भावना असेल, अशी भावना रोहित शर्माने व्यक्त केली.


Previous Post Next Post