पंजाबला धूळ चारत आरसीबीची आयपीएलच्या फायनलमध्ये दणक्यात एंट्री; क्वालिफायर-1 सामन्यात आरसीबीचा पंजाबवर दणदणीत विजय
मुल्लानपूर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 मध्ये एक शानदार कामगिरी करत क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली. आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा आरसीबी पहिला संघ बनला आहे. 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबी पुन्हा एकदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरली आहे. आरसीबी कर्णधार रजत पाटीदारने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या शिलेदारांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आणि संपूर्ण संघ फक्त 101 धावांवर बाद झाला. आरसीबीने 10 षटकांत हे लक्ष्य सहज गाठले.
आरसीबीच्या संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली. आरसीबीने टॉस जिंकला आणि कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी स्विकारली. हा निर्णय त्यांच्यासाठी चांगलाच फायदेशीर ठरला. कारण त्यांच्या गोलंदाजांनी या संधीचे सोने केल्याचे पाहायला मिळाले. कारण आरसीबीने दुसऱ्या षटकापासून पंजाबच्या संघाला धक्के द्यायला सुरुवात केली. या धक्क्यातून पंजाबचा संघ सावरू शकला नाही. कारण आरसीबीने यावेळी गोलंदाज असे वापरले की, पंजाबच्या फलंदाजांना उसंतच मिळाली नाही. पंजाबकडून सर्वाधिक धावा या २६ झाल्याचे पाहायला मिळाल्या, ज्या मार्कस स्टॉइनिसने केल्या. यावरून पंजाबची फलंदाजी कशी गडगडली असेल, हे समजता येऊ शकते. आरसीबीच्या संघात यावेळी मॅचविनर जोश हेझलवूड दाखल झाला होता आणि त्याचा चांगलाच फायदा यावेळी संघाला झाला.
जोश हेझलवूडने यावेळी ३.१ षटके गोलंदाजी केली, यामध्ये त्याने फक्त २१ धावा दिल्या आणि तीन विकेट्स मिळवले. जोशला यावेळी सुयश शर्मानेही तीन विकेट्स देत चांगली साथ दिली. अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीच्या संघाला पंजाबला १०१ धावांत ऑल आऊट करता आले आणि तिथेच त्यांनी सामना जिंकला होता. आरसीबीचा संघ विजयासाठी १०२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा, पण त्यांना विराट कोहलीच्या रुपात मोठा धक्का बसला. विराट कोहलीला यावेळी १२ धावांवर समाधान मानावे लागले. विराटनंतर मयांक अगरवालही १९ धावांवर बाद झाला. पण विजयासाठी समोर असलेले आव्हान हे फारच कमी असल्यामुळे त्यांच्यावर जास्त दडपण नव्हते आणित त्यांनी हा सामना सहजपणे जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला.