Home

आला रे आला रोहित आला.. हीटमॅनच्या वादळापुढे चेन्नईचे लोटांगण; मुंबई इंडियन्सने साकारला मोठा विजय

आला रे आला रोहित आला.. हीटमॅनच्या वादळापुढे चेन्नईचे लोटांगण; मुंबई इंडियन्सने साकारला मोठा विजय

मुंबई(वार्ताहर)

आला रे आला रोहित फॉर्मात आला... अशी भावना चेन्नईच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या सच्च्या चाहत्यांच्या मनात होती. रोहित शर्माने वानखेडेवर तुफानी खेळी साकारली. रोहितच्या या वादळी फटकेबाजीपुढे चेन्नईने सपशेल लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मोठा विजय साकारता आला. चेन्नईने मुंबईपुढे विजयासाठी १७७ धावांचे आव्हान ठेवले होते आणि त्यांनी तेे रोहितच्या फटकेबाजीच्या जोरावर ९ विकेट्स राखत पूर्ण केले. रोहितने यावेळी ७६ धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने ६८ धावा काढल्या.

रोहित शर्मावर यापूर्वी धावा रुसल्या की काय, असे वाटत होते. पण रोहितसारख्या खेळाडूला फॉर्मात येण्यासाठी एकच सामना पुरेसा असतो आणि हीच गोष्ट MI vs CSK या सामन्यात पाहायला मिळाली. रोहित शर्माने सुरुवातीपासून चेन्नईच्या गोलंदाजीवर कडक प्रहार करायला सुरुवात केली. रोहितने सुरुवातीला ओव्हरटर्नच्या गोलंदाजीवर प्रहार केला, पण त्यानंतर आक्रमक गोलंदाज असलेल्या खलील अहमदलाही त्याने सोडले नाही. रोहित शर्माने पहिल्या पॉवर प्लेमध्ये चेन्नईच्या गोलंदाजीला आपल्यापुढे नतमस्कत करण्यास भाग पाडले होते. रोहित शर्माने अफलातून टायमिंगच्या जोरावर षटकारांचा वर्षाव सुरु केला आणि त्यामध्ये मुंबईचे चाहते न्हाहून निघाले.

रोहित शर्माने धडाकेबाज फटकेबाजी करत या सामन्यात आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे हे या आयपीएलमधील पहिले अर्धशतक ठरले. पण अर्धशतक पूर्ण केल्यावर रोहित शांत बसला नाही, रोहितने यावेळी धमाकेदार फटकेबाजी सुरुच ठेवली आणि त्याने मुंबईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. रोहित शर्माला यावेळी सूर्यकुमार यादवने चांगली साथ दिली आणि या दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. हार्दिकने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारली आणि पण मुंबईकर आयुष म्हात्रेने यावेळी मैदान गाजवले. घरच्या मैदानात आयुषने पदार्पण केले आणि आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने १५ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३४ धावा केल्या. आयुष बाद झाला आणि चेन्नईची धावगती रोढावली. पण त्यानंतर शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकं करत संघाला १७६ धावांपर्यंत पोहोचवले.

Previous Post Next Post