राज्यात एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा इशारा
मुंबई(वार्ताहर)
देशात सध्या वेगवगेळ्या पद्धतीचं वातावरण बघायला मिळत असून या सातत्यानं होणाऱ्या बदलांचे परिणाम महाराष्ट्राच्याही हवामानावर होताना दिसत आहेत. देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये सध्या उष्णता शिगेला पोहचली असून, काही राज्यात पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये एकिकडे खूप गरमी वाढत असतानाच दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
्राज्यात विदर्भात गारपिटीची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील. तसंच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे. पुढील दिवस अवकाळी पावसाचा इशारा आणि गारपिटीची शक्यता असल्यामुळे अवकाळीचा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
कोकणातील जिल्ह्यांत आज काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहील. महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण होत असतानाच केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं पूर्व मध्य भारत, उत्तर पूर्व भारत आणि अरुणाचल प्रगेशात 23 मार्च रोजी ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवत 20 ते 23 मार्चदरम्यान या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये उत्तर पश्चिम भारतामध्ये कमाल तापमान 3 ते 5 अंशांनी वाढणार असल्याचा इशारा आयएमडीनं जारी केला आहे. याव्यतिरिक्त देशातील हवामानात कोणतेही लक्षणीय बदल होणार नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.