मुंबई इंडियन्सने विजयाचे खाते उघडले; 'केकेआर'चा उडवला धुव्वा
मुंबई(प्रतिनिधी)
पहिल्या विजयासाठी आसुसलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरचे पानीपत केले आणि सहजपणे सामना जिंकला. अचूक गोलंदाजी करत मुंबईने केकेआरला ११६ धावांत ऑल आऊट केले होते. तिथेच मुंबईने अर्धी लढाई जिंकली होती. त्यानंतर मुंबईने ८ विकेट्स आणि ४३ चेंडू राखत हा सामना सहजपणे जिंकला आणि आपले विजयाचे खाते उघडले. पदार्पणातच ५ विकेट्स घेत केलेल्या चमकदार कामगिरीमुळे मुंबईचा अश्वनी कुमार या सामन्याचा हिरो ठरला.
मुंबईने सुरुवातीपासून केकेआरला धक्के द्यायला सुरुवात केली होती. मुंबईने केकेआरची २ बाद २ अशी अवस्था केली होती. त्यानंतर पदार्पण करणारा अश्वनी कुमार हा गोलंदाजीला आला आणि त्याने या संधीचे सोने केले. अश्वमीने प्रथम केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. त्यानंतर केकेआरच्या मधल्या फळीतील फलंदाजांवर त्याने दहशत गाजवली. अश्वमीने त्यानंतर रिंकू सिंग, मनीष पांडे आणि आंद्रे रसेलसारख्या दिग्गज फलंदाजांना बाद केले आणि मुंबई इंडियन्सच्या विजयाचा पाया रचला. अश्वमीने यावेळी चार विकेट्स मिळवताना २४ धावा दिल्या, दीपक चहरने दोन बळी मिळवत त्याला सुरेख साथ दिली.
मुंबईसाठी विजयाचे ११७ असे माफक आव्हान होते. रोहित शर्मा सलामीला आला. त्याने झोकात सुरुवात केली. पण रोहितला यावेळी मोठी खेळी साकारताआली नाही. रोहित यावेळी १३ धावांवर बाद झाला. पण दुसरा सलामीवीर रायन रिक्लेटनने केकेआरच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रायनला यावेळी संघात पुनरागमन करणाऱ्या विल जॅक्सने चांगली साथ दिली. केकेआरच्या गोलंदाजांना यावेळी आपली छाप पाडता आली नाही. रायनने यावेळी अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.