दादरवरून सोडण्यात येणारी सावंतवाडी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथून सोडावी; अन्यथा रेल रोको करण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा इशारा
मुंबई(वार्ताहर)
सावंतवाडी पॅसेंजर गाडीवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मध्य रेल्वेला थेट रेल रोकोचा इशारा दिला आहे. एकीकडे कोकणातील चाकरमानी शिमग्याला कोकणात जाण्याच्या तयारीत असतानाच हा इशारा देण्यात आल्याने चाकरमान्यांना या आंदोलनाचा फटका बसणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
दादरवरून सोडण्यात येणारी सावंतवाडी पॅसेंजर गाडी दिवा येथून सोडण्यात येत असल्याने कोकणातील चाकरमान्यांना त्याचा फायदा होत नसल्याचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे ही गाडी पूर्वीप्रमाणे दादर येथून सोडावी अशी मागणी ठाकरेंच्या पक्षाने केली आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मध्य रेल्वेला डेडलाइनही दिली आहे. सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन पूर्वीप्रमाणे दादरमधून सोडण्याचा निर्णय 1 मार्चपूर्वी घेतला नाही तर रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना भेटून दिला आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने महाव्यवस्थापक मीना यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यासाठी रेल कामगार सेनेने मध्य रेल्वेला दोनदा पत्र दिले होते आणि कार्यवाहीला गती देण्याची मागणी केली होती. त्याकडे रेल्वे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. दोन्ही पॅसेंजर लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन देऊन 40 दिवस उलटले तरी प्रशासन ढिम्म राहिले. कोकणी जनतेवर केल्या जाणार्या या अन्यायाला आमचा पक्ष वाचा फोडेल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
