पुण्यात गुलेन बँरी सिड्रोम आजारामुळे महिलेचा मृत्यू
पुणे(प्रतिनिधी)
पुण्यात आज गुलेन बँरी सिड्रोम जीबीएसमुळे बळी गेला असून सिंहगड परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती व १५ जानेवारीपासून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. याआधी सोलापूर येथील एकाचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. पुणे विभागात जीबीएसमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. पुण्यात सध्या जीबीएसचे १२७ रुग्ण असून त्यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. केंद्रीय पथकही पुण्यात दाखल झाले असून संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेऊन आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोमचा पुण्यात उद्रेक झाल्याचं दिसून येत असून जिल्ह्यातील बाधित गावांत सध्या भीतीचे वातावरण आहे. पुण्यातील विविध भागात जीबीएसचे रुग्ण आढळले असून त्याची गंभीर दाखल आता केंद्राने घेतली आहे. केंद्राच्या सात सदस्यीय पथकानं 29 जानेवारी रोजी पुण्यातील नांदेड गावात भेट देत त्या ठिकाणच्या विहिरीतील पाण्याची पाहणी केली. केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश होता.
दुसरीकडे संभाव्य परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र GBS च्या रुग्णांवर मोफत उपचारांसाठी नेमलेल्या कमला नेहरू रुग्णालयात एकही न्यूरोलॉजिस्ट नसल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुलेन बॅरी सिंड्रोम हा ऑटोइम्युन आजार असून तो प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शननंतर काही आठवड्यांत होतो. मात्र त्यावर उपचार उपलब्ध असल्याने लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.