देवरुख आगाराला नवीन बसेस तातडीने मिळाव्यात
आमदार शेखर निकम यांची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे आग्रही मागणी
देवरुख(वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख एसटी आगाराची बससेवा पुरती कोलमडली आहे. आगारातील बसेसची अपुरी संख्या व अनेक बसेस नादुरुस्त असल्यामुळे आगार अनेक मार्गांवर बसेस उशिराने सुटत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसेसअभावी प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेवून चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी देवरुख आगाराला नवीन बसेस तातडीने मिळाव्यात, अशी आग्रही मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चिपळूण आगारासाठीही नवीन बसेसची मागणी त्यांनी केली आहे.
संगमेश्वर तालुक्याचा बहुतांश भाग हा ग्रामीण व डोंगराळ आहे. याठिकाणी सुरळीत बससेवा देणे अंत्यंत आवश्यक आहे. मात्र नादुरुस्त बसेस, गाड्यांची कमतरता आणि जुन्या झालेल्या गाड्या रस्त्यात केव्हाही बंद पडण्याची शक्यता असल्यामुळे देवरूख आगार प्रशासनाला आगाराचा कारभार हाकताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे आगाराचा कारभार सुरळीत चालण्यासाठी आगाराला आणखी नवीन बसेसची आवश्यकता आहे.
देवरूख आगारात असणाऱ्या बसेसची अपुरी संख्या व ज्या बसेस आहेत त्या दुरुस्तीसाठी कार्यशाळेत आहेत. त्यामुळे आगाराचे वेळापत्रक वारंवार कोलमडत आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. याच अडचणी लक्षात घेऊन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री. शेखर निकम यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे देवरुख आगाराला नवीन बसेस तातडीने देण्याची आग्रही मागणी केली आहे. परिवहन मंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून मंत्री श्री. सरनाईक यांनी सदर मागणीवर तातडीने माहिती घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे देवरुख आगाराला नवीन बसेस मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
