Home

गडचिरोलीत जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा


 

गडचिरोलीत जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा

गडचिरोली(वार्ताहर)

राज्यातील माओवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे. देशातील क्रमांक दोनच्या माओवादी कमांडरच्या पत्नीने आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गडचिरोली पोलीस मुख्यालयात टॉप माओवादी कमांडरने आत्मसमर्पण केलं आहे. विशेष बाब म्हणजे आज आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी कमांडर असल्याने माओवाद्यांची चळवळ अधिक खिळखिळी झाली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत सी-६० जवानांचा सत्कार सोहळा आणि माओवाद्यांचा आत्मसमर्पणाचा कार्यक्रम पार पडला. जहाल महिला माओवादी नेता तारक्कासह ११ नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. तारक्का ही माओवाद्याच्या संघटनेचं देशभरातलं दुसऱ्या क्रमांकाचं नेतृत्व असलेल्या केंद्रीय समिती सदस्य भूपतीची पत्नी तर बंगालमध्ये चकमकीत ठार झालेला जहाल माओवादी नेता किशनजीची वहिनी आहे. तारक्का१९८३मध्ये माओवाद्यांच्या संघटनेत दाखल होणारी गडचिरोलीतील पहिली महिला माओवादी आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अहेरी ते गरदेवाडा बस स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर पहिल्यांदाच धावत आहे. त्या बसचं उद्घाटन आज झालं. पेनगुंडाला नवीन आऊटपोस्ट सुरु केलं असून कोनसरीमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं,यामुळं गडचिरोलीला स्टील सिटीचा दर्जा मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद हा जवळजवळ संपुष्टात आणण्याचं काम सुरु केलं आहे. उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली आहे. दक्षिण गडचिरोली माओवादापासून लवकरच मुक्त होईल याबाबत मनात शंका नाही. तारक्काचे मूळ नाव विमला सीडाम असून त्या दडकरण्या झोनल समितीची सदस्या आहे. तिच्यावर १७० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार राज्यात मिळून एक कोटी पेक्षा जास्तीच बक्षीस आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी चळवळीत दाखल करण्यात तारक्काने सगळ्यात मोठी महत्वाची भूमिका बजावली आहे.

Previous Post Next Post