Home

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक

 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन फरार  आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले व  सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक

पुणे(विशेष प्रतिनिधी)

 बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक केल्यानंतर पोलीस आता या दोन्ही आरोपींचा सहभाग नेमका कसा होता याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न  करतील. तसंच आतापर्यंत हाती लागलेले धागेदोरे आणि त्यांच्या चौकशीत येणारी माहिती जुळवण्याचा प्रयत्न असेल. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाचा वेग पोलिसांनी वाढवला आहे. खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला होता. तर हत्या प्रकरणात आणखी तीन आरोपी हे फरार होते. पोलीस तिघांचा गेल्या काही दिवसांपासून शोध घेत होते. अखेर दोघांना अटक करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यानंतर सर्व आरोपी फरार होते. देशमुख यांच्या हत्येचे परिणाम संपूर्ण राज्यात उमटले होते. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी मार्फत केला जात आहे. 

दरम्यान, बीड पोलिसांच्या विशेष पथकानं सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना अटक केली असून त्यांना सीआयडीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांना आधी पोलिसांनी अटक केली होती. तीन आरोपी फरार होते, यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे फरार होते. यामधील आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांना अटक केलीय. मात्र कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून मुख्य आरोपी फरार होते. पुण्यामध्ये सापडलेल्या आरोपींची पोलिसांना आधी कशी माहिती मिळाली नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Previous Post Next Post