धो धो पावसात पेणमध्ये कवितांचा पाऊस ....कविता ही मानवी मनाच्या भावविश्वाचे प्रतिबिंब - नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील
पेण (वार्ताहर)
कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती मानवी मनाच्या भावविश्वाचे जिवंत प्रतिबिंब आहे, असे उद्गार पेण नगरीच्या नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील यांनी साहित्याचा शब्दवेल,पनवेल आणि साहित्यसंपदा,पेण आयोजित काव्य स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी काढले.
पेणच्या महात्मा गांधी वाचनालयामध्ये झालेल्या या काव्य स्पर्धा सोहळ्याचे उद्घाटन पेण नगरीच्या नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक, इतिहासाचार्य काशिनाथ मढवी, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर,मराठी साहित्य मंडळ पेणच्या माजी अध्यक्षा विभावरी जोशी,माजी सरकारी वकील मनोज म्हात्रे,साहित्यिका जोशना राजपूत, सुनिता रामचंद्र व गणेश कोळी, स्तंभ लेखक,कवी साहित्यसंपदाचे लालसिंग वैराट उपस्थित होते.
यापुढे बोलताना नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील म्हणाल्या,मराठी साहित्याचा इतिहास पाहिला तर संत साहित्यापासून आधुनिक साहित्यापर्यंत अनेक कवी आणि साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले आहे.कविता ही कधी वेदनांना शब्द देते,तर कधी दुःख हलके करून नव्या आशेची प्रेरणा देते,असे सांगून अगदी भर पावसात होणाऱ्या या काव्य स्पर्धेच्या उपक्रमाचे नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील यांनी कौतुक केले.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक, इतिहासाचार्य काशिनाथ मढवी, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर,मराठी साहित्य मंडळ पेणच्या माजी अध्यक्षा विभावरी जोशी यांची भाषणे झाली.
आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक:- प्राजक्ता सागवेकर,द्वितीय क्रमांक:- प्रथमेश कासार,तृतीय क्रमांक:- आर्या जोजे हे कवी विजेते ठरले.काव्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून साहित्यिका जोशना राजपूत आणि सुनिता रामचंद्र यांनी काम पाहिले. पाऊस,निसर्ग,प्रेम,कुटुंब,आई, पर्यटन,पत्नी आदी विषयांवर आपल्या कविता कवींनी सादर केल्या.उपस्थित सर्व कवींना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. काव्य स्पर्धा सोहळ्याचे प्रास्ताविक साहित्यिक गणेश कोळी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पालकर यांनी केले.