Home

चलो अलिबाग!”च्या हाकेला हजारोंचा प्रतिसाद: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा; घोषणांनी अलिबाग दणाणला


“चलो अलिबाग!”च्या हाकेला हजारोंचा प्रतिसाद :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा; घोषणांनी अलिबाग दणाणला

 रेवदंडा — सचिन मयेकर

“चलो अलिबाग… चलो अलिबाग…”च्या गगनभेदी घोषणांनी आज अलिबाग शहर अक्षरशः दणाणून गेले. रायगड जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एकजुटीने रस्त्यावर उतरले.

रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटकशी संलग्न, नोंदणी क्र. डी.एन.ई. ९०८) यांच्या वतीने या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक ११ वाजता अलिबाग येथील संघटना सदन (मारुती नाका) येथून मोर्चाला सुरुवात झाली. घोषणांच्या गजरात हजारोंचा लोंढा जिल्हा परिषदेकडे मार्गस्थ झाला.

मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला. “हमारी मांगे पुरी करो, वरना खुर्ची खाली करो... ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा विजय असो.,  ग्रामपंचायत संघटनेच्या एकजुटीचा विजय असो.. अशा घोषणांनी परिसर काही काळ दणाणून गेला.

रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर पोहोचताच कर्मचाऱ्यांचा आवाज आणखी तीव्र झाला. प्रलंबित मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

संघटनेने पूर्वी सादर केलेल्या निवेदनानुसार सेवा अटी व वेतनविषयक प्रश्न निकाली काढणे, प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेणे, तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनस्तरावर न्याय्य सुविधा देणे या प्रमुख मागण्या आहेत. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, अलिबाग पोलीस ठाणे यांच्या वतीने परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा शांततेत पार पडला असला तरी घोषणांच्या आवाजाने प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाल्याचे चित्र होते.

मोर्चानंतर आयोजित सभेत पदाधिकाऱ्यांनी पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे संकेत दिले. “आजचा एल्गार हा केवळ इशारा नसून न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील,” असा निर्धार संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केला.

Previous Post Next Post