Home

विठूरायाच्या रचना



विठूरायाच्या रचना



ओढ पंढरीची



आषाढी,कार्तिकी |चाले वारकरी |

भेटण्या श्रीहरी |उल्हासाने....||१||


वैष्णवांचा मेळा |चंद्रभागा तीरी |

वृंदावन शीरी |माऊलींच्या....||२||


उभा विटेवरी| जगाचा नाविक|

असंख्य भाविक| दर्शनाला||३||


ओढ पंढरीची | लागे विठुराया  |

आनंदली काया |किर्तनात ...||४||


गजर करण्या| टाळ नि मृदंग|

सुंदर अभंग| गाती सारे||५||


ओढ पंढरीची |भक्ता लागे आस |

नित्य एक ध्यास |पांडुरंग.....||६||


पाहे वारकरी |याची देही डोळा |

सुखाचा सोहळा |पंढरीत.....||७||



श्रीम. अंजली अरविंद गुंजोटे

लातूर....


************************



जय हरी विठ्ठल



मनातला विठ्ठल 

मनातल्या मनात 

ओठांवर अवतरतो 

भक्तीच्या सुरात.....


श्रद्धा समर्पण 

 आणि विश्वास 

विठ्ठल नामाचा 

गजर  असा खास....


विश्वास भक्तांचा 

श्वासात ध्यास 

पंढरीचा राजा 

तुझ्या भेटीची आस.....


अठ्ठावीस युगांचा प्रवास 

विचारशील केव्हा विठुराया

कशी आहेस तू आज 

कशी आहेस तू आज....


     कवयित्री सौ.आशा झिल्पे 

           नागपूर 


*****************

भेटीची आस



 वारी पंढरीची ।नाम घेत श्रीहरीचे

 हाती झेंडा । मुखी नाम श्रीहरीचे


 चिपळ्या हाती ।भजनाच्या साथी

 मृदंग वाजे। जय घोष साजे


 थरथरती पैंजण। धरती रिंगण गळा 

तुळशी माळ ।जीव होई तळमळ 


चंद्रभागेचे दर्शना। आस मोठी मना

 नामदेव पायरी ।दुःख ना उरी


 लल्लाटी चंदनाचा टिळा। संतांचा होई मेळा 

तल्लीन वारकरी। पावल्या धरी


 कीर्तनाच्या तालावर। नाचतो श्रीरंग

 क्षणोक्षणी मीळे सुख ।आनंदात होई दंग


उराऊरी ओढ तुझी ।भेटण्या पुढे चाली

 दर्शन दे रे आता ।इच्छा एकच मणी


 माझ्या विठूचे रूप ।देखने गोजिरे

 नजर उतराया। सूर्य चंद्र तारे



 सौ,भाग्यश्री संदीप बारवाल. 

छत्रपती संभाजीनगर.


***************


सखा मुरारी.


प्रेमात माउलीच्या जातात लोक भारी

वारीत चालताना भेटे सखा मुरारी


ओढीत भेटण्याच्या नामात दंग कोणी

लाभात दर्शनाच्या वाटे सदा खुमारी


वेडात धावलेले घेऊन टाळ चिपळ्या

केलेत बंद डोळे हातात एकतारी


भेटीस सावळ्याच्या गोतावळा निघाला

एकादशी असावी भक्तास लाभणारी


संसार तो सुखाचा ठेवून पार मागे

जातात पंढरीला चालून पूर्ण वारी


सौ.सविता म्हात्रे.मुंबई


***************

Previous Post Next Post