💥💥 *ब्रेकींग बातमी*
राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; संपूर्ण राज्याला उद्या रेड अलर्ट
मुंबई
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, पुण्यासह घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ४८ तासांत राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून दोन दिवसांत दाखल होईल. साधारण 25 मे पर्यंत दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, बंगालच्या उपसागरातील शाखाही सक्रिय झाली आहे. त्या बाजूनेही मान्सून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. राज्यात उद्या रविवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. मात्र, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 48 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचं धुमाकुळ घातला आहे.
पुढचे दोन दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवला आहे.राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक व नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजांच्या कडकडाटादरम्यान झाडांखाली किंवा विद्युत खांबांजवळ उभे राहू नये. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.