भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा कार अपघातात मृत्यू
लातूर
बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड जवळ सायंकाळी पावसामुळे देशमुख यांची कार स्लीप होऊन रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात पडली. यामध्ये आर. टी. देशमुख यांना जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे ते खंदे समर्थक होते. पंकजा यांच्या दसरा मेळाव्याला ते कायम उपस्थित असायचे. मुंडे समर्थक नेते म्हणून त्यांची ओळख होती. कारचा चालक आणि अंगरक्षक दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज सोमवारी सायंकाळी आर. टी. देशमुख हे सोलापूर येथून परळीकडे परतत असताना राष्ट्रीय महामार्ग क्र 361 वरील बेलकुंड उड्डाण पुलावरून जातांना हा अपघात झाला. रस्ता ओला व निसरडा झाल्याने तसेच रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी स्लीप होवून सुरक्षा कठडा तोडून दुभाजकावर जोरात आदळली आणि चार वेळेस पलटी झाली. या अपघातात आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले आर. टी. देशमुख यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पक्षात प्रवेश केला होता.
तेव्हापासून ते कायम भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते राहीले. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे ते 2014 मध्ये 13 व्या विधानसभेत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झाले होते. याशिवाय त्यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशमध्ये महत्वाच्या पदावर काम केले. मनमिळावू , प्रेमळ आणि सर्वांना सहकार्य करणारा असा त्यांचा स्वभाव होता, त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमात असतानाच त्यांना ही माहिती कळाली. त्यानंतर तातडीने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत नांदेडहून लातूरकडे प्रस्थान केले. आर टी देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला. तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. किनीकर यांच्याशीही संवाद साधून माहिती घेतली.
