महावितरण कर्मचारी पावसातही अखंड सेवा देणारे हिरो
अलिबाग (ओमकार नागावकर)
पावसाळा म्हटला की विजेच्या तांत्रिक अडचणी वाढतात – कधी वायर तुटते, कधी ट्रान्सफॉर्मर बिघडतो, तर कधी संपूर्ण परिसर अंधारात जातो. अशा संकटाच्या वेळी महावितरण कर्मचारी, तसेच अधिकारी... हे वीज गेल्यानंतर अगदी शर्तीचे प्रयत्न करत असतात. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी.
वर्षभर नक्कीच ते मेन्टेनंस करत असतील... परंतु मुसळधार पाऊस, वेगाने होणारा वारा, विजेचे कडकडाट, विजेचे खांब कोसळणे, मोठ-मोठाली झाडे पडणे, असे अनेक नैसर्गिक आपत्ती पावसाळ्याच्या काळात होत असतात या सर्व आपत्तींवर मात करण्यासाठी महावितरण कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता चिखलात उतरत, जोराच्या पावसात, वाऱ्यात, रात्री-अपरात्री उंच पोलांवर चढून वायर दुरुस्त करणे, ट्रान्सफॉर्मर तपासणे किंवा गंजलेले साहित्य बदलणे हे काम ते पूर्ण दक्षतेने करतात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता.
परंतु गावा-खेड्यातील अनेक भाग अत्याधुनिक नसल्यामुळे या परिस्थितीला सामोरे जावे लागते. या कर्मचाऱ्यांचे कार्य केवळ तांत्रिकच नाही, तर ते एक सामाजिक जवाबदारीने पार पाडतात. पावसात अडकलेल्या गावांमध्ये वीज पोहोचवणे, शेतकऱ्यांच्या पंपांना वीज मिळवून देणे, तसेच शाळा, दवाखाने यांना अखंड वीजपुरवठा यासाठी त्यांची धडपड सुरू असते.त्यांच्या या झगड्याला अनेकदा समाजाकडून अपेक्षित तेवढे कौतुक मिळत नाही, पण प्रत्यक्षात हे कर्मचारी खरे हिरो आहेत.
