Home

आईच्या पोटात बाळ अन् त्या बाळाच्या पोटातही बाळ; अचंबित करणारी दुर्मिळ घटना


आईच्या पोटात बाळ अन् त्या बाळाच्या पोटातही बाळ; अचंबित करणारी दुर्मिळ घटना 

बुलढाणा(वार्ताहर)

आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असं घडू शकतं का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. अशा केस दुर्मिळ असतात असंही डॉक्टर सांगतात. अशीच एक केस आता बुलडाण्यात समोर आली आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे. यानंतर डॉक्टरही अचंबित झाले आहेत.   

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमित चेकींगसाठी एक गर्भवती महिला आली होती. ही महिला 32 वर्षाची होती. तिला या आधी दोन मुलंही आहेत. हे तिचं तिसरं आपत्य असणार आहे. या तपासणी दरम्यान तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर अचंबित झाले. त्याला कारणही तसेच होते. महिलेच्या पोटात 9 महिन्याचं बाळ होतं. पण त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं या रिपोर्टमध्ये दिसून आलं. 

या बाळाची ही वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे.  मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला 'फीटस इन फीटू' असे म्हटले जाते.  अर्भकांमध्ये अर्भक असणे अशी ही घटना आहे. यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारण पणे 5 लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते. असं डॉक्टर सांगतात. डॉ. भागवत भुसारी हे जिल्हा शल्य चिकित्सक आहे. त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. डॉ. भुसारी सांगतात की अशा केस या दुर्मिळ असतात. पाच लाखात एखादी केस ही आमच्या समोर येते. याला फीटस इन फीटू असं म्हटलं जातं. मात्र अशा बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. हे तितकेच धोक्याचेही असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या आधीही अशा केसेस समोर आल्याचे भुसारी यांनी सांगितले. दरम्यान अशी केस समोर आल्यानंतर त्याची चर्चा सध्या बुलडाण्यात सुरू झाली आहे. 

Previous Post Next Post