Home

मुखी तुझे नाम...कवी सचिन पाटील, रसग्रहण: कवयित्री शरयु पाम्पट्टीवार


 

अभंग रसग्रहण..



*मुखी तुझे नाम*



मुखी तुझे नाम| राहो सदोदित|

आयुष्याचे हित| तुज ज्ञात||१II


गणपती बाप्पा| भक्तांचा लाडका|

विघ्नविनाशका| गजानना|२II


तुजला अर्पण| मोदकाची गोडी|

भक्त  पुण्य जोडी| आपसूक||३II


तुझे नाम घ्यावे| आनंदित व्हावें|

गुणगान गावे |विघ्नेश्वरा||४II


एकमेव ध्येय | उरी बाळगले| 

 पाऊल टाकले| ध्येयाकडे ||५II 


तुला स्मरताना| मिळे वरदान|

सुरूवात छान| दिवसाची||६II 


 मनोभावे सेवा |  करतो सचिन| 

चरणात लीन| मोरयाच्या ||७||




*मुखी तुझे नाम* या शीर्षकाखाली कवी सचिन पाटील यांनी बाप्पा मोरयाचे गुणगान वर्णन करून नमन केले आहे.कवी गणेशभक्त आहेत.कुठल्याही कार्यारंभी बाप्पाचे स्मरण केल्यास कार्याची फलप्राप्ती सुखद होते.म्हणूनंच अभंग लेखन शृंखला अतूट राहण्यासाठी कवीने अभंग स्वरूपात श्रीगणेशवंदना केली आहे.



 *मुखी तुझे नाम| राहो सदोदित|* 

 *आयुष्याचे हित| तुज ज्ञात||१II* 


मुखात सदैव बाप्पा मोरयाचेच नाव राहावे.त्याच्याच नामस्मरणात आपल्या आयुष्याचं हीत आहे, असं मानणारे कवी बाप्पालाच सांगतात की तुलाच ठाऊक आहे की तुच माझ्या आयुष्याचा खरा हितचिंतक आहेस.


 *गणपती बाप्पा| भक्तांचा लाडका|* 

 *विघ्नविनाशका| गजानना|२II* 


गणपती बाप्पा हा भक्तांचा लाडका आहे.निस्सिम श्रद्धाभाव असणाऱ्या आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी बाप्पा सदैव पाठीशी असतात.संकटसमयी हाकेला धावून येणारा बाप्पा गजानन विघ्नविनाशक म्हणूनच गणला जातो. 


 *तुजला अर्पण| मोदकाची गोडी|* 

 *भक्त  पुण्य जोडी| आपसूक||३II* 


बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी  जास्वंदीचे लाल फुल,दुर्वांकूर वाहतात आणि नैवैद्याला मोदक करून जणू ते आपोआपच आपल्या पुण्यामध्ये वाढ करत जातात.मोदकांचा नैवेद्य खाऊन , बाप्पा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतो.


 *तुझे नाम घ्यावे| आनंदित व्हावें|* 

 *गुणगान गावे |विघ्नेश्वरा||४II* 


रात्रंदिवस तुझ्या नामात मन तल्लीन व्हावे.आनंदीत व्हावे.या मुखातून सदैव तुझेच गुणगान गायले जावे.हे विघ्नेश्वरा माझ्या हातून तुझी निरंतर सेवा घडावी, असे कवी म्हणतात.


 *एकमेव ध्येय | उरी बाळगले|* 

 *पाऊल टाकले| ध्येयाकडे ||५II* 


साहित्य क्षेत्रात निःस्वार्थ सेवा देण्याचे एकमेव ध्येय मनात बाळगले.आणि त्याच धेय्याकडे अथक परिश्रमाने वाटचाल सुरू आहे.हे टाकलेले पाऊल शुभ ठरू दे.सत्कारणी लागू दे, असे कवी बाप्पाला म्हणतात.


 *तुला स्मरताना| मिळे वरदान|* 

 *सुरूवात छान| दिवसाची||६II*


तुझ्या नामस्मरणाने दिवसाची छान सुरुवात होते.आनंद मिळतो.जणू यशस्वी भव चे वरदान प्राप्त होते.


 *मनोभावे सेवा |  करतो सचिन|* 

 *चरणात लीन| मोरयाच्या ||७||* 


गणेशभक्त कवी सचिन पाटील दादा बाप्पा मोरयाची मनोभावे सेवा करतात.नामस्मरणात लीन होऊन गुणगान गातात.अन् बाप्पाने देखील भक्ताची सेवा बघून प्रसन्न होऊन वरदान द्यावे.


  अशा प्रकारे जो कोणी बाप्पाची निस्वार्थ भक्ती करेल त्याला बाप्पा नक्कीच संकटात साथ देईल.फक्त मनात शुद्ध भाव हवा, असे कवी सर्वांना सांगत आहेत.


कवी- सचिन पाटील.आलिबाग,रायगड.

रसग्रहण-सौ.शरयु  पाम्पट्टीवार.

दिग्रस, यवतमाळ.



Previous Post Next Post