Home

ऋषभ पंतचा विश्वविक्रम; टेस्ट क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडला; टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये शतक करणारा ऋषभ पंत भारताचा पहिलाच विकेट कीपर ठरला


 


ऋषभ पंतचा विश्वविक्रम; टेस्ट क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडला; टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये शतक करणारा ऋषभ पंत भारताचा पहिलाच विकेट कीपर ठरला


लीड्स- 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही ऋषभ पंतने शतक झळकावलं आहे. एकाच टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये शतक करणारा ऋषभ पंत भारताचा पहिलाच विकेट कीपर ठरला आहे. मॅचच्या चौथ्या दिवशी आधी केएल राहुल आणि त्यानंतर ऋषभ पंत यांनी केलेल्या शतकामुळे टीम इंडियाची आघाडी 300 रनच्या जवळ पोहोचली आहे. दिवसाची सुरूवात टीम इंडियाने 90-2 अशी केली होती, पण सुरूवातीलाच कर्णधार शुभमन गिलच्या रुपात भारताने तिसरी विकेट गमावली. ब्रायडन कार्सने 8 रनवर गिलला बोल्ड केलं.


गिलची विकेट गेल्यानंतर राहुल आणि पंत यांनी संयम दाखवत बॅटिंग केली आणि भारताला अडचणीतून बाहेर काढलं. 118 रनची खेळी करून ऋषभ पंत आऊट झाला. बशीरच्या बॉलिंगवर सिक्स मारण्याच्या नादात पंतने विकेट गमावली. दुसऱ्या इनिंगमध्ये शतक केल्यानंतर सुनिल गावसकर यांनी पंतला पुन्हा एकदा कोलांटीउडी मारण्याचा आग्रह केला, पण पंतने पुढच्या शतकानंतर असं म्हणत गावसकरांना इशारा केला. एका टेस्टच्या दोन इनिंगमध्ये शतक करताच ऋषभ पंतने इतिहास घडवला आहे. एका टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शतक करणारा पंत जगातला दुसरा आणि भारताचा पहिलाच विकेट कीपर ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले टेस्टमध्ये पंतने 134 आणि 118 रनची खेळी केली. याआधी 2001 साली झिम्बाब्वेच्या ऍन्डी फ्लॉवरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरारेमध्ये 142 आणि नाबाद 199 रन केले होते.


एकाच मॅचमध्ये दोन शतकं करणारा ऋषभ पंत सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी विजय हजारे, सुनिल गावसकर (3 वेळा), राहुल द्रविड (2 वेळा), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांनीही एका टेस्टमध्ये दोन शतकं केली होती. इंग्लंडमध्ये दोन शतकं करणारा पंत पहिला भारतीय आहे. ऋषभ पंतने या टेस्ट मॅचमध्ये दोन्ही इनिंग मिळून 252 रन केल्या. इंग्लंडमध्ये झालेल्या टेस्ट मॅचमध्ये एखाद्या विकेट कीपरने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी इंग्लंडच्या ऍलेक स्टुअर्टने 1998 साली ओल्ड ट्रॅफर्डमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 40 आणि 164 असे एकूण 204 रन केले होते.


Previous Post Next Post