Home

सातवीतील विद्यार्थ्याची राज्यस्तरीय नेमबाजीत कमाल; मल्हार कदमला तीन कांस्यपदके

 सातवीतील विद्यार्थ्याची राज्यस्तरीय नेमबाजीत कमाल; मल्हार कदमला तीन कांस्यपदके

अलिबाग (ओमकार नागावकर) 

 कॅप्टन एस. जे. इझेकल मेमोरियल महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप या प्रतिष्ठित राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत कुलाबा रायफल व पिस्टल शूटिंग क्लबचा युवा नेमबाज मल्हार राहुल कदम याने उल्लेखनीय यश संपादन करत एकाच स्पर्धेत तीन कांस्यपदके पटकावली.

महाराष्ट्र रायफल असोसिएशन (MRA) आयोजित या स्पर्धेत मल्हारने १० मीटर एअर रायफल प्रकारात ४०० पैकी ३८२ गुणांची उत्कृष्ट नोंद केली. या कामगिरीच्या जोरावर त्याने युथ, सब-युथ आणि ज्युनियर या तिन्ही गटांत प्रत्येकी एक अशी एकूण तीन कांस्यपदके आपल्या नावावर केली.

महाराष्ट्रातील नेमबाजांसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांकडे वाटचाल करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत मिळवलेले यश मल्हारच्या सातत्यपूर्ण सरावाचे आणि जिद्दीचे फलित मानले जात आहे.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या वरळी येथील रेंजवर उत्साहात पार पडला. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते अशोक पंडित (अध्यक्ष, MRA), शीला कानूंगो (सचिव, MRA), चंद्रकांत पुजारी (सदस्य, MRA) तसेच विधानपरिषद सदस्य दुष्यंत चतुर्वेदी हे मान्यवर उपस्थित होते.

सेंट मेरी हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या मल्हार कदमला प्रशिक्षक योगेश गडमाळे, मेहुल राठोड, मंदार गडकरी आणि यतिराज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post