फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह 2026 उत्साहात संपन्न
अलिबाग (प्रतिनिधी)
अलिबाग, दि. 7 जून 2026 : भारत सरकारच्या "फिट इंडिया मूव्हमेंट" अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस दल आयोजित, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या "फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह 2026 – संडेज ऑन सायकल" या उपक्रमास अलिबाग येथे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रविवार, दि. 7 जून 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनची सुरुवात पोलीस अधीक्षक कार्यालय, अलिबाग येथून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक किशोर साळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.
ही सायकल रॅली पोलीस अधीक्षक कार्यालय, अलिबाग येथून वरसोली फाटा, बुरुमखान, महावीर चौक मार्गे अलिबाग बीचपर्यंत पार पडली. नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन तसेच नशामुक्त भारत या संकल्पनेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, माणुसकी प्रतिष्ठान, स्पर्धा विश्व अकॅडमी, लायन्स क्लब, अलिबाग सायकल राइडर्स, अलिबाग पोलीस ठाणे तसेच विविध सामाजिक संस्था व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला विकास पाटील, अलिबाग सायकल राइडर्सचे अनिरुद्ध आठवले व सहकारी, सरस नर्सिंग होमचे डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, समाजसेवक प्रणित म्हात्रे, डॉ. मेघा घाटे, स्पर्धा विश्व अकॅडमीचे तपस्वी गोंधळी, उज्ज्वल माणुसकी समन्वयक ममता रुपेश म्हात्रे, माणुसकी प्रतिष्ठानचे तानाजी आगलावे तसेच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ऋषिकेश साखरकर, पोलीस हवालदार अमर जोशी, पोलीस हवालदार मिथुन मातेरे आणि पोलीस शिपाई संकेत पाटील यांच्यासह पोलीस अंमलदार व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व सहभागी नागरिकांनी उत्साहाने सायकल रॅली पूर्ण करून *"फिट इंडिया"*चा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये नियमित व्यायाम, सायकलिंग आणि निरोगी जीवनशैलीबाबत सकारात्मक जनजागृती झाली.
सायक्लोथॉन 2026 चा समारोप अलिबाग बीच येथे करण्यात आला. यावेळी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या वतीने सहभागी सायकलस्वारांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.