Home

स्व. मीनाक्षीताई पाटील वक्तृत्व करंडक प्रार्थना बेटकर ठरल्या मानकरी |


 स्व. मीनाक्षीताई पाटील वक्तृत्व करंडक 

प्रार्थना बेटकर ठरल्या मानकरी

| अलिबाग | प्रतिनिधी | 

पुरोगामी विद्यार्थी संघटना रायगड, पुरोगामी युवक संघटना अलिबाग व सांस्कृतिक सेल अलिबागच्या वतीने जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या रोहामधील कोलाड येथील प्रार्थना प्रसन्न बेटकर ठरल्या असून, त्यांना स्व. मीनाक्षीताई पाटील वक्तृत्व करंडक व 17 हजार पाचशे रुपये रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकाचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, ॲड. परेश देशमुख, नागेश कुलकर्णी, शरद वरसोलकर, नंदकुमार तळकर, दत्ता ढवळे, शरद कोरडे, अनिल चोपडा आदी मान्यवर, पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख हर्ष ढवळे, पुरोगामी युवक संघटना अलिबागचे प्रमुख विक्रांत वार्डे, पुरोगामी विद्यार्थी संघटना अलिबाचे प्रमुख वेदांत कंटक, सांस्कृतिक सेलचे अलिबागचे प्रमुख राजन पांचाळ, वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व स्पर्धेक उपस्थित होते. 

‌‘स्थानिक प्रश्नांचे राज्यस्तरीय नेतृत्व मीनाक्षीताई पाटील, येवा कोकण आपलोच असा-पण विकासाचं काय? सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे, संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे, नफरत के बाजार मे मोहोब्बत बेच रहा हूं मै, सकारात्मक बदलाची सुरुवात-व्यक्तीच्या प्रयत्नातून समाजापर्यंत, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग‌’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा  घेण्यात आली. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या शैलेतून वक्तृत्व करून प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध वक्ते डॉ. पंकज पवार, संदीप जगे, मिलिंद घाडगे यांनी काम पाहिले. 

या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रार्थना प्रसन्न बेटकर यांनी मिळविला असून, त्यांना रोख 11 हजार, पाच हजार, एक हजार व पाचशे रुपये असे एकूण सोळा हजार पाचशे रुपये व चषक दिले. पनवेल येथील पंकज पाडूळे यांना द्वितीय क्रमांकाचे रोख आठ हजार व पाचशे रुपये असे एकूण साडेआठ हजार रुपये व चषक देण्यात आले. 

महाडमधील लक्ष्मण विठ्ठल कचरे यांना तृतीय क्रमांकाचे रोख पाच हजार व पाचशे रुपये असे एकूण साडेपाच हजार रुपये व चषक देण्यात आले. तळामधील धु्रव जितेंद्र राऊत यांना चतुर्थ क्रमांकाचे रोख तीन हजार, पाचशे रुपये व चषक अलिबागमधील संयोगी राजेंद्र नाईक यांना पाचव्या क्रमांकाचे रोख दोन हजार, पाचशे रुपये व चषक देऊन गौरविण्यात आलेे. तसेच वैशाली शेखर पाटील, रोहित राजेश पाटील, अमोल रामचंद्र गोळे, श्रवण वामन कदम, आदित्य गणेश शिर्के यांना प्रत्येकी एक हजार व पाचशे रुपये व चषक अशी पाच उत्तेजनार्थ बक्षिसे यांना देऊन सन्मानित केले. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Previous Post Next Post