झुंझार युवक मंडळ पोयनाडचे अध्यक्ष अन्वर बुराण यांचे दुःखद निधन.
पोयनाड (प्रतिनिधी-)
रायगड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात सर्वात जुन्या व अग्रगण्य असलेल्या झुंझार युवक मंडळ पोयनाडचे अध्यक्ष अन्वर इस्माईल बुराण यांचे दि.८ ऑगस्ट रोजी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.गुरुवारी दुपारी पोयनाड येथील जामा मशिदीत नमाज पठण करत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथील हॉस्पिटलमध्ये नेत असतांना वाटेत त्यांची प्राणजोत मावळली.मृत्यू समयी त्यांचे वय ६९ होते. झुंझार युवक मंडळ पोयनाड संघांसाठी त्यांनी १९७० ते ८० च्या दशकात कबड्डी खेळाडू म्हणून जिल्हास्तरीय स्पर्धा खेळले आहेत,एक उत्कृष्ठ कबड्डीपटू म्हणून त्यांची ओळख संपूर्ण रायगड जिल्ह्यात होती.पुढे त्यांनी झुंझार युवक मंडळ पोयनाडचे अध्यक्ष पदाची जबाबदारी गेली ३० वर्ष यशस्वीरीत्या पार पाडली,उत्कृष्ठ संघटन कौशल्य व समाजातील सर्व वर्गांच्या लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची क्षमता त्यांच्या मध्ये होती.
झुंझारच्या क्रीडांगणावर दरवर्षी जिल्हास्तरीय कबड्डी,क्रिकेट लेदर व टेनिस बॉल स्पर्धांचे जिल्ह्यास्तरीय आयोजन करणे तचेच जिल्हास्तरीय कॅरमच्या स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असे.रायगड जिल्ह्यातील युवा खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिले आहे.पोयनाडच्या जमाते मुसलमीन समजाचे सुद्धा ते अध्यक्ष होते.व्यवसायिक क्षेत्रात त्यांची सुपर बेकरी संपूर्ण पोयनाड पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे,क्रीडा,सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या अन्वर उर्फ पप्पा बुराण यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण पोयनाड विभागात शोककळा पसरली आहे,झुंझारने आपला कर्तृत्ववान अध्यक्ष गमावला तर मुस्लिम समाजाने सर्वांना बरोबर घेऊन जाणार आपला हक्काचा माणूस आज गमावला आहे.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,दोन मुले दोन मुली,एक भाऊ,दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.
रायगड जिल्हा कबड्डी,क्रिकेट व कॅरम असोसिएशन,झुंझार युवक मंडळ,पोयनाड व्यापारी असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी,सदस्य व खेळाडूंनी त्यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त केले आहे.आज बुराण यांच्या अंत्ययात्रेला क्रीडा,सामाजिक,राजकिय व व्यापारी वर्गाने मोठी गर्दी केली होती.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
